डोंबिवली – अनेक वर्षांपासून डोंबिवली एमआयडीसीत सरळमार्गी, प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे बहुतांशी मराठी उद्योजक काही ठराविक उद्योजकांच्या बनवेगिरीमुळे खूप अडचणीत आले आहेत. या बनवेगिरीच्या वातावरणात काम करणे अशक्य असल्याने अनेक मराठी उद्योजकांनी आपले डोंबिवली एमआयडीसीतील उद्योग बंद केले. काहींनी औद्योगिक भूखंडावरील आपला ताबा कायम ठेवण्यासाठी कंपन्यामधील उत्पादन क्षमता कमी करून लहान प्रमाणात, तर काहींनी कंपनी वापरात प्रक्रिया बदल करून लहान प्रमाणात कामगारांचे नुकसान नको म्हणून कंपन्या सुरू ठेवल्या आहेत.

डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक उत्पादनांचे लहान, मोठे एकूण सुमारे ७५० कारखाने आहेत. यामधील बहुतांशी कारखाने मंदीच्या लाटेत तर काहींनी शासन अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या उपद्रवाला कंटाळून बंद केले. डोंबिवलीत एमआयडीसी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वसवली गेली. या कालावधीत त्यावेळी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी आलेल्या मराठी मध्यम वर्गातील तरुणांनी उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यावेळी डोंबिवली एमआयडीसीत भूखंड घेऊन उद्योग, व्यवसाय सुरू केले आहे. उच्चशिक्षित असलेल्या तरुणांना सामाजिक भान असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाही त्यांच्या उद्योग सुरू करण्यामागील मुख्य उद्देश होता.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला

नाममात्र दराने त्यावेळी औद्योगिक भूखंड उपलब्ध होत होते. इतर भाषक उद्योजक त्यावेळी येथे येऊ लागले. कमीत कमी भांडवलात कष्ट करून मराठी उद्योजकांनी उद्योग सुरू केले, असे जुने जाणते उद्योजक सांगतात.

सुरुवातीच्या काळात प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य आणि कामगार विभागातील अधिकाऱ्यांचा फारसा उपद्रव कंपनी मालकांना नव्हता, असे जुने उद्योजक सांगतात.

इतर भाषक मंडळीही हळुहळू डोंबिवली एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यासाठी सरसावली. इतर भाषकांमधील जुन्या जाणत्यांनी सरळमार्गाने सुरू केलेला व्यवसाय नवीन पीढीच्या हातात येऊ लागला. तसा कंपनी उत्पादन, भेसळ, खर्च टाळण्यासाठी प्रदूषण हे प्रकार सुरू झाले. हे प्रकार झाकण्यासाठी नियंत्रक एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा अधिकारी मोजक्या उद्योजकांसाठी सरसकट सर्वच उद्योजकांना त्रास देऊ लागले.

यापूर्वी कंपनी तपासणीसाठी वर्षातून एकदा येणारे अधिकारी अलीकडे महिन्यातून दोन ते तीन वेळा येऊ लागले. ज्या कंपनीत गडबडी आहेत. ते उद्योजक नियंत्रक अधिकाऱ्यांना ‘गार’ करून पाठवू लागले. या पद्धतीचा प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या मराठी उद्योजकांना सर्वाधिक त्रास होऊ लागला.

हेही वाचा – भिवंडीतील ऑर्क्रेस्टा बारवर क्राईम ब्रांचची कारवाई, मॅनेजरसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल

आपल्या उद्योगातील नीती मूल्य सांभाळत काही मराठी उद्योजक व्यवसाय करत होते. पण अलीकडे कंपनी उत्पादन, साठवण, परवाने या माध्यमातून गडबडी करणारे उद्योजक अधिकाऱ्यांना खिशात घालत आहेत.

गडबडी करणारे ताठ मानेने आणि कष्टप्रद व्यवसाय चालविणारे बहुतांशी मराठी उद्योजक या सगळ्या बनवेगिरीत भरडले जात आहेत. अधिकाऱ्यांचा त्रास वाढू लागला. या सगळ्या त्रासाला कंटाळून बहुतांशी मराठी उद्योजक कंपन्या बंद करून, दुसऱ्याला चालवायला देऊन किंवा कंपनीत प्रक्रिया बदल करून आपली घरगुती कामे करणे पसंत केले आहे. अनेक मराठी उद्योजकांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. पण याविषयी उघडपणे बोलण्यास नकार दिला.