डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा, मोठागाव, गणेशनगर उल्हास खाडी किनारा भागात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, चरस-गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ वाढली आहे. या भागातील झाडे, झुडपे, मोकळ्या मैदानांचा आधार घेऊन ही मंडळी पोलिसांचा धाक नसल्याने बिनधास्त नागरिकांना उपद्रव देत आहेत. रविवारी रात्री देवीचापाडा गोपीनाथ चौक येथे एका रिक्षा चालकावर एका गर्दुल्ल्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे.

जगदीश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते गोपीनाथ चौकातील सद्गुरू दर्शन सोसायटीत राहतात. माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे ते नातेवाईक आहेत. रविवारी रात्री वाढत्या उष्णतेमुळे जगदीश म्हात्रे घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेत सद्गुरू दर्शन सोसायटी लगतच्या भरत भोईर नाल्याच्या कट्ट्यावर, काही जण नाल्या जवळील झाडाखाली चरस-गांजा यांचे सेवन करत बसले होते. काही जण मद्यपान करत टोळक्याने बसले होते.

हेही वाचा – चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम; मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला

ही टोळकी मद्य सेवन करून या भागात ओरडा करत होती. रात्रीची वेळ झाली असल्याने लोकांना सोमवारी कामाला जायचे आहे. ओरडा करू नका असे रिक्षा चालक जगदीश म्हात्रे यांनी घरा जवळून चाललेल्या गर्दुल्ल्यांना सांगितले. त्याचा राग एका गर्दुल्ल्याला आला. त्याने काही क्षणात जगदीश म्हात्रे यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत हातामधील धारदार स्टीलच्या कड्याचा वार रिक्षा चालक जगदीश यांच्या नाकावर केला. नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर दुसरा वार हल्लेखोराने रिक्षा चालकाच्या डोळ्यावर करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गर्दुल्ल्याने रिक्षा चालकाला जोराने जमिनीवर ढकलून देऊन हल्लेखोर पळून गेला.

विष्णुनगर पोलिसांना ही माहिती म्हात्रे यांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी परिसरात घेतला पण ते या भागातून पळून गेले होते.

देवीचापाडा येथील कलावती आई मंदिराजवळील एका मोकळ्या भूखंडावर दररोज रात्री आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यपींचे एक टोळके उघड्यावर मद्य सेवन करण्यासाठी बसते. मद्याची गुंगी चढल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. पादचाऱ्यांना टोमणे मारतात. कलावती आई मंदिरात अनेक भाविक उपसना करण्यासाठी आलेले असतात. काही जण प्रार्थना करतात. त्यांनाही या मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. परिसरातील सोसायटी, चाळींमधील रहिवासी या मद्यपींच्या त्रासाला कंटाळले आहेत. मागील काही महिन्यांपासून उघड्यावर हे मद्यपी मद्य सेवन करत आहेत.

हेही वाचा – भिवंडीतील ऑर्क्रेस्टा बारवर क्राईम ब्रांचची कारवाई, मॅनेजरसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल

विष्णुनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत खाडी किनारची झुडपे, झाडे परिसरात गस्त घातली तर गांजा सेवन करणारे, मद्यपी टोळकी सापडण्याची शक्यता रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. रिक्षा चालकावर हल्ला झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.