येऊर म्हणजे ठाणे शहराचे वैभव! उत्तर मुंबई आणि ठाणे शहर यांच्या मधोमध ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ वसलेले आहे. याच अभयारण्याच्या ठाण्याकडील बाजूस येऊरचे जंगल आहे. घनदाट जंगल, हिरवाईने नटलेली टेकडी, विविध वनस्पती, रानफुले, वळणावळणाचा रस्ता, बिबटय़ांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर आणि येथील आदिवासी संस्कृती.. येऊरच्या जंगलात भटकंती करताना या साऱ्यांचेच दर्शन घडते.
विपुल वनसंपत्ती, निरोगी व स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल, तर येऊरशिवाय दुसरा पर्याय नाही. जंगलात ठाकर, वारली, कातकरी आदिवासींची संख्या अधिक. त्यामुळेच येथे जागोजागी आदिवासी पाडे आहेत. नैसर्गिक सौंदर्यसंपत्तीबरोबरच येथील आदिवासी समाजजीवनही जवळून पाहता येते. विकासाच्या परिसस्पर्शापासून दूर असलेल्या या पाडय़ावर काही वेळ व्यतीत केल्यानंतर मनास एकप्रकारचे समाधान लाभते.
येऊरच्या जंगलात बिबटे, हरिण, भेकर, साळिंदर, कोल्हा, माकड, ससा यांसह विविध प्राणी आढळतात. त्याशिवाय विविध सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक यांसाठी हा परिसर नंदनवनच आहे. जंगलातून फेरफटका मारताना विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. या जंगलात विविध वनस्पती आढळतात, विविधरंगी फुले पाहून मन प्रसन्न होते. त्याशिवाय येथील आदिवासींच्या उपजीविकेचे साधन असलेल्या रानभाज्याही आढळतात.
येऊर टेकडीच्या एका बाजूस उंच माथ्यावर एक दर्गा आहे. यास मामा-भाच्याचा दर्गा असे म्हणतात, त्यामुळे या टेकडीलाही काही जण मामा-भाच्याची टेकडी असे म्हणतात. हे नाव का पडले, याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. या टेकडीवरून ठाणे शहराचे मन अचंबित करणारे विहंगम दृष्य दिसते. येऊरमध्ये एका बाजूस भारतीय हवाई दलाचा तळ असून येथे फिरकण्यास सक्त मनाई आहे.
पावसाळय़ात येऊरमध्ये एक वेगळीच मजा असते. येऊरच्या टेकडीला बहर फुटलेला असतो, हिरवाईने ओलीचिंब झालेली ही टेकडी निसर्गाचे एक लेणेच वाटते. असंख्य झरे, धबधबे टेकडीच्या पोटातून फुटतात आणि तेथील आनंदाची लयलूट करण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येतात.
टेकडीवर असलेल्या या परिसरात दोन घटका नीरव शांतता अनुभवावयास मिळते. जंगलभ्रमंती करावयास आणि फेरफटका मारण्यास आवडतो, अशांसाठी येऊरची टेकडी नंदनवन आहे. धकाधकीच्या जीवनात दोन क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी येथे भेट देण्यास काय हरकत आहे. अतिशय शुद्ध हवेचा पुरवठा करणारे येऊर म्हणजे ठाणे शहराचे ‘फुप्फुस’ आहे.
येऊर, ठाणे कसे जाल?
’ ठाणे स्थानकाबाहेर येऊरला जाण्यासाठी बस सुटतात किंवा उपवन तलावाकडे किंवा पोखरणकडे जाणाऱ्या बस येऊरच्या प्रवेशद्वाराजवळून जातात.
दांडग्या पर्यटकांचा त्रास
येऊरच्या जंगलात आता बरेच धनदांडगे पर्यटक येत असल्याने तिथे जागोजागी आता बंगले दिसू लागले आहेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी पर्यटक येथे येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी अनेक हॉटेल, पर्यटन केंद्र येथे उभारली आहेत. पण काही पर्यटकांकडून निसर्गास बाधा आणली जात आहे. येथे दारूपाटर्य़ाचे प्रमाणही वाढल्याने त्याचा त्रास स्थानिक आदिवासी व अन्य पर्यटकांना होतो. येऊरच्या वन विभागाने व प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
