उल्हासनगरः पालिकेची आर्थिक स्थिती नाजून असल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेने १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेले छपाई यंत्र न वापरताच भंगारात काढण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरातून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. २००८ वर्षात पालिकेने १२ छपाई यंत्रे खरेदी केली होती. मात्र त्यांचा एकदाही वापर केला नाही.

एकीकडे मालमत्ता कर वसुलीत सातत्याने येणारे अपयश, त्यामुळे विकास कामांवर होणारा परिणाम आणि नागरिकांना अपुऱ्या मिळणाऱ्या पालिकेच्या सुविधा या चक्रात अडकलेल्या उल्हासनगरवासियांच्या कररूपी पैशांचा चुराडा उल्हासनगर पालिकेने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर महापालिकेत कामकाजात सहजता यावी यासाठी संगणक आणि विद्युत विभागाकडून २००८ साली काही छपाई यंत्रे खरेदी करण्यात आली होती. खरेदी केलेल्या या छपाई यंत्रांचा वापर पालिका प्रशासनाने करणे अपेक्षित होते. मात्र तब्बल १५ वर्षे कोणत्याही विभागाने ही यंत्रे वापरली नाहीत. धक्कादायक म्हणजे कोणत्याही विभाग प्रमुखानेही या छपाई यंत्रांकडे ढुंकुनही पाहिले नाही. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने विविध विभागातील ई कचरा संकलनाची मोहीम राबवली. याच मोहिमेत संगणक विभागातून निघालेल्या या ई कचऱ्यात ही यंत्र भंगारात टाकण्यासाठी काढण्यात आली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला.

हेही वाचा – अंबरनाथमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, प्रकाशनगर भागात पहिल्या प्रकल्पासाठी हालचाली, पहिली बैठक सकारात्मक

हेही वाचा – ठाणे : एक महिन्यात ४२ मुलांचे पुनर्वसन, जिल्हा महिला बालविकास विभागाची कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोक्यातून ही यंत्रे बाहेरही काढण्यात आलेली नसल्याचे यावेळी दिसून आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. या प्रकारानंतर उल्हासनगर शहरात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. हा शहरातील नागरिकांच्या कररूपी पैशांचा चुराडा असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. याप्रकरणी पालिका स्तरावर चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.