ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागाकडून सुरु असलेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात एकीकडे खळबळ उडाली असली तरी शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या ठाण्यातील प्रशासकीय वर्तुळावर मात्र आपल्या मर्जीचा अधिकारी बसविण्यात सध्या तरी त्यांना यश आल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शिनगारे निवृत्तीच्या वाटेवर असताना या पदावर शिंदे यांच्या निकटवर्तीयाची निवड होणार का अशी चर्चा आहे. भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यात मोकळीक देणार का, याविषयी देखील तर्कवितर्क लढविले जात आहेत. असे असताना या जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला नियुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरविकास विभागाकडून विवीध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टील मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी मध्यंतरी चाप लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विवीध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याचे नक्की करण्यात आले आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित येणाऱ्या एमएमआरडीए, एमएसआरडीसी एमआयडीसी, सिडको यासारख्या महत्वाच्या विभागांमधील मोठया रकमेच्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
विशेषत: ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांच्या मंजुरीवर मुख्यमंत्र्यांची मोहर उमटायला हवी असे ठरविण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांची नाकाबंदी केली जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एकीकडे ही चर्चा असली तरी ठाणे या आपल्या गृहजिल्ह्यावर आपलेच अधिकारी असतील यासाठी शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना सध्या तरी यश येताना दिसत आहे.
एकनाथ शिंदेच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याचे घेतलेल्या एका निर्णयानुसार नवीन सोना यांची ठाणे जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन सोना हे उपमुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले. भाजपला या निवडणुकीत अभूतपुर्व असे यश मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले.
महायुतीने ही निवडणुक तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यामुळे राज्यात सत्ता आल्याने शिंदे यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद येईल अशी त्यांच्या समर्थकांची आशा होती. मात्र तसे झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबत गृहनिर्माण, नगरविकास, रस्ते विकास महामंडळासारखी प्रमुख खाती राहीली आहेत. नव्या मंत्री मंडळात उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून सोना यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यापुर्वी राज्याच्या आरोग्य विभागात काम केलेले सोना हे शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. शिंदे यांच्याकडे असलेल्या सर्व खात्यांमधील प्रमुख निर्णयांचे समन्वयक म्हणून ते काम पहातात. शिंदे यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे पालक सचिव पद सोना यांच्याकडेच सोपवून त्यांनी आपल्या गृह जिल्ह्यावर प्रभाव राखण्यात यश मिळविल्याची चर्चा आहे.
ठाण्याचे नवे जिल्ह्याधिकारी कोण ?
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे येत्या ३० तारखेला शासकीय सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील जिल्हाधिकारी याठिकाणी असावा असा शिंदे यांचा आग्रह आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यावर वरचष्मा राखण्यातही शिंदे यशस्वी होतील. ठाणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले असले तरी जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्तपदी आपल्याच विश्वासाचा अधिकारी हवा असा शिंदे यांचा आग्रह आहे. नव्या जिल्हाधिकारी कोण असेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना पालक सचिव नवीन सोना असतील याची काळजी शिंदे यांनी घेतल्याची आता चर्चा आहे.