कल्याण : पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य गुप्त विभागाच्या कल्याण शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमुख दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झाले आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते संभाजी देशमुख यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.संभाजी देशमुख आता राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कल्याण शाखेत साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
गुन्हे विषयक तपास, गोपनीय उच्च दर्जाच्या खबरी आणि त्या दिशेने तपासाला दिशा देणे यामध्ये देशमुख निष्णांत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई-कल्याण प्रमुख पदावर देशमुख यांनी काम केले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपायुक्त सर्वश्री छेरिंग दोरजे, श्रीकांत सावरकर, फत्तेसिंह पाटील, किशोर जाधव, दीपक साकोरे, संंदीप जाधव अशा अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी देशमुख यांनी उत्कृष्ट सेवा आणि कामगिरी बजावली आहे.
कल्याणमध्ये वास्तव्यास असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांचा काही सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध आहे. पोलीस दलातील नोकरी सांभाळून ते दुर्बल घटक, गरजू, गरीब मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी काम करतात. सन २०१६ मध्ये पोलीस दलातील उत्कष्ट कामगिरीबद्दल देशमुख यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळाले होते. सन २०१८ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह संभाजी देशमुख यांना मिळाले होते. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देशमुख यांना कुटुंबीयांसह सन्मानित केले होते.
ठाणे शहर आयु्क्तालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना देशमुख यांनी शासकीय, महापालिका, इतर आस्थापनांमधील लाचखोरीचे सापळे यशस्वी केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांची कामगिरी नेहमीच सरस ठरली आहे. एखादी माहिती अचूक मिळवून त्या माहितीचा पाठपुरावा करणे आणि त्या अनुशंगाने योग्य तपासासाठी वरिष्ठांना साहाय्य करण्यात देशमुख यांचा हातखंडा आहे.
संभाजी देशमुख यांचे एक बंधू कल्याणमध्ये उद्योजक आहेत. दुसरे बंधू सुदाम देशमुख हे माजी सैनिक आहेत. महावितरणमधून अलीकडेच ते लेखापरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. देशमुख यांनी आपली नोकरी सांभाळत असताना मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांना उच्च शिक्षण दिले. त्यांची मुले अमेरिकत उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, विद्यावाचस्पती पदव्या मिळवून कार्पोरेट कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ आहेत.