Thane ghodbandar Road condition: ठाणे : ठाणे, मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्वाचा मानला जातो. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून मोठी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका नोकरदार, स्थानिक तसेच इतर प्रवाशांनाही बसतो. यंदाही हे चित्र कायम आहे. त्यावर गेल्या अभिनेता आस्ताद काळे ( Aastad Kale) यांनी महिनाभरापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट एक महत्त्वपूर्ण व्हिडीओ शेअर करून नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी आता घोडबंदर रस्त्यासंदर्भात आणखी एक पोस्ट शेअर करत नातवासाठी नवीन टेस्ला ( TESLA ) कार खरेदी करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांना सवाल केले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाणे, मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्वाचा मानला जातो. या मार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावरून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे सुद्धा या विषयावर पोस्ट टाकून समाजभानही जपताना दिसून येत आहेत. आजूबाजूच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते बिनधास्त आणि बेधडकपणे आपली मते व्यक्त करत असून त्यामध्ये सोशल मीडियावर कायमच सक्रिय असलेला अभिनेता आस्ताद काळे हा आपल्या पोस्टमधून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम करत असतो. संताप व्यक्त करताना आपण भाषा सभ्य ठेवली पाहिजे. आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे, पण यंत्रणेबद्दल तसेच आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींविषयी बोलताना आपली संस्कृती आणि मर्यादा जपायला हव्यात. हीच आपली संस्कृती आहे, असे त्यांनी महिनाभरापूर्वी एका पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांनी आता घोडबंदर रस्त्यासंदर्भात आणखी एक पोस्ट शेअर करत नातवासाठी नवीन टेसला ( TESLA ) कार खरेदी करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सवाल केले आहेत.
आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती ?
त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला (TESLA) रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका ? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका? ( ता.क:- १) एवढा पैसा आला कुठून काका? २)तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना. बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता ) असा प्रश्न अभिनेता आस्ताद काळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये विचारला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली टेस्ला कार
देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खरेदी केली. ही जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते. ” टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल “, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली होती.