ठाणे : वागळे इस्टेट येथे पार्किंगच्या वादातून दोन तरुणांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, गोकुळनगर येथे क्षुल्लक कारणावरुन दोन गटांमध्ये झालेल्या वादात एकाने विळ्याने हल्ला केला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात गुंडप्रवृत्तीच्या मुलांकडून असे प्रकार केले जात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. विळ्याने हल्ला करतानाचे चित्रीकरण परिसरातील रहिवाशांनी काढल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
यश मोरे (१९), साहिल सावंत (२०), शिरीश कांबळे (२०) आणि गणेश शेलार (२३) अशी गुन्हा दाखल असलेल्या मुलांची नावे आहेत. गोकुळनगर येथे दरवर्षी आषाढ आमवस्यापूर्वी देवीचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. या पालखी सोहळ्याच्या मिरवणूकीत काही तरुणांचे वाद झाले होते. गुरुवारी रात्री तीन ते चार तरुण परिसरात गप्पा मारत असताना यश, साहिल, शिरीश आणि गणेश हे चौघे त्याठिकाणी आले.
मिरवणूकीत वाद करण्यासाठी तुम्ही होते असे म्हणत त्यांनी त्या तरुणांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी यश याने लाकडी फळीने तरुणाला मारहाण केली. तर विशाल याच्या हातामध्ये एक विळा होता. तो विळा त्याने तरुणावर हल्ला करण्यासाठी उपसला. या घटनेत तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर गणेश शेलार याने विळ्याने परिसरातील नागरिकांना म दाखविली.
दरम्यान, याप्रकरणी तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८ (१), ३ (५), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मिरवणूकीत काही तरुण वाद घालत असतात. एका मुलाने विळा घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही टोळक्यांकडून परिसरात वारंवार असे प्रकार घडवून आणले जात आहेत असे परिसरात राहणाऱ्या तथा रणरागीनी वस्तीस्तर संघांच्या अध्यक्षा जमुना सुभाष बिळगे यांनी सांगितले.