लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर: मे महिन्यात झालेल्या एका मृत्यू प्रकरणाला हत्येचे रूप देऊन त्यात माझे नाव गोवून मला भाजपाप्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप उल्हासनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस आणि माजी नगरसेवक भारत राजवानी उर्फ गंगोत्री यांनी केला आहे. तसेच यात कलानी पिता पुत्रही सहभागी असल्याचा आरोप गंगोत्री यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत वाद विकोपाला गेला असून राजकारण तापले आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात भाटिया चौकात मे महिन्यात अर्जुन काळे या व्यक्तीचा अपघात झाला. अपघातानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप करत कलानी समर्थकांनी गंगोत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. काळे यांच्या कुटुंबीयांनी ही हत्याच असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आरोपाच्या केंद्रस्थानी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि प्रदेश चिटणीस भरत राजवानी उर्फ गंगोत्री यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. गंगोत्री यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी आणि त्यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आणखी वाचा-खा. श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी, ‘कल्याण लोकसभेसाठी भाजप म्हणेल तोच उमेदवार’

अर्जून काळे या मोबाईल चोराच्या मृत्यूप्रकरणात मला अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न उल्हासनगरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे माजी आमदार पप्पू कालानी आणि त्यांचा मुलगा ओमी कालानी हे दोघेही करीत आहेत. अर्जून काळेचा अपघाती मृत्यू हत्या असल्याचे दर्शवून त्यात माझे नाव बळजबरीने गोवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा आणि भाजपाप्रवेश करावा या हेतूने हा प्रकार सुरू असल्याचा खळबळजनक दावा गंगोत्री यांनी केला आहे. एका बाजूला कालानी समर्थक वातावरण निर्मिती करतात आणि दुसरीकडे सत्ताधारी गटातील नेते पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आणतात असा आरोप गंगोत्री यांनी केला आहे. तर माझी आमदार पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी हे आरोप फेटाळले असून उलट गंगोत्री यांच्यावर कारवाईसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

गंगोत्री हे खोटे आरोप करत असून गंगोत्री यांच्या साथीदारांनी मिळून ही हत्या केली आहे. मृताच्या कुटुंबीयांनीही तसा आरोप केला आहे. याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. -ओमी कलानी.

आणखी वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा येथील सभेजवळ विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू

हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांवर आरोप केला आहे. भाजपचा या प्रकरणाशी संबंध नाही. -जमनादास पुरसवानी, भाजप जिल्हाध्यक्ष, उल्हासनगर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उघड गंगोत्री आणि कलानी गट आहेत. गंगोत्री यांनी संकटाच्या काळात पक्ष सावरला. कलानी यांनी भाजप प्रवेश करत सत्ता मिळवली. सध्या पप्पू कलानी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा ओढा असून त्यामुळे गंगोत्री नाराज आहेत. दोन्ही गटात त्यामुळे संघर्ष वाढला आहे