ठाणे : मीरा-भाईंदर येथील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी ८ जुलै रोजी मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला परवानगी नसल्याने अनेक मोर्चेकऱ्यांची तसेच मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. यानंतर कार्यकर्त्यांचा रोष पाहता मोर्चाला तातडीने परवानगी देण्यात आली. हे सर्व प्रकरण शांत होऊन दोनच दिवस झाले असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवार, १८ जुलै रोजी मिरा भाईंदर येथे येणार असल्याची माहिती मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या समाज माध्यमांवरून दिली आहे.

मराठी भाषा बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्याला उत्तर म्हणून मंगळवार ८ जुलै रोजी मनसेने मराठी भाषिकांच्या मोर्चाची हाक दिली होती. शिवसेना (ठाकरे) तसेच मराठी एकीकरण समितीसह अनेक संघटनांनी मोर्चाला पाठिंबा देत सहभागाचे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी मिरा भाईंदरमधील बालाजी हॉटेल चौकात मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चा सुरू होताच आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. याचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटले. सरकार पोलिसांचा धाक दाखवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला, अखेर दुपारी मोर्चाला परवानगी देण्यात आली.

बालाजी हॉटेलपासून मिरा रोड रेल्वे स्थानक पर्यंत हा मोर्चा निघाला. यामध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते. तर या मोर्चाचे आयोजक असलेले मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना मोर्चाच्या एक दिवस आधी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर मोर्चाला परवानगी दिल्याने अविनाश जाधव यांची सुटका करण्यात आली. त्यांची सुटका झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर येथे मोर्चाला संबोधित करत जोरदार भाषणे केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चाच्या दिवशी मोठा गोंधळ झाल्याने सायंकाळच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समाज माध्यमांवर मजकूर प्रसारित करून सर्व कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना प्रसारमाध्यमांशी कोणत्याही पद्धतीचा संवाद न साधण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र असे असताना आता शुक्रवार, १८ जुलै रोजी राज ठाकरे हे मीरा-भाईंदर मध्ये येणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी आपल्या समाज माध्यमांवरून दिली आहे. त्यामुळे मोर्चात झालेला गोंधळ आणि मनसे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची पोलिसांनी केलेली धरपकड याबाबत राज ठाकरे मीरा-भाईंदर मध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.