ठाणे: ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे ३१ जुलैला निवृत्त झाले. परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांनी निवृत्ती पूर्वी अनेक फाईलींवर सह्या करुन त्या मंजूर केल्या. राजकीय दबावापोटी हा प्रकार झाला असून या सर्व फाईलींबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन ३१ जुलैला त्यांच्या दोन फाईल मंजूर करून घेतल्या अशी माहिती आमच्याकडे असेही अविनाश जाधव म्हणाले.

राज्यातील सत्ताबदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. तर, राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्याने यांची बदली झाली असल्याच्या ही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलेच चर्चेत आले होते. ३१ जुलैला अशोक शिनगारे हे देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फाईलींवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

काय म्हणाले अविनाश जाधव

– मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आरोप केले. अविनाश जाधव म्हणाले की, निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे दोन दिवस फक्त सह्या करत होते. ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते. इतके वर्ष ते ठाण्यात होते, त्यावेळी त्यांनी या सह्या का नाही केल्या असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत असे जाधव म्हणाले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असेही जाधव म्हणाले. लोढा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत. मंगलप्रभात लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते, ते फाईल मंजूरीसाठी गेले होते का, याची देखील चौकशी व्हावी असे जाधव म्हणाले. अविनाश जाधव यांनी याबाबत सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली.