पोलीस स्थापना दिनाच्या सप्ताहानिमित्त अंबरनाथमध्ये जागृती अभियान
पोलीस दलामार्फत सध्या पोलीस स्थापना दिनाचा सप्ताह सुरू असून यानिमित्ताने शाळांमधील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना पोलीस ठाण्यातून भेटीसाठी निमंत्रणे देण्यात आली होती. शाळांमधील विद्यार्थीही या निमंत्रणावरून पोलीस ठाण्याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेत आहेत. तसेच पोलीस खात्यातील अधिकारीही शाळांमध्ये जात जनजागृतीपर परिसंवादांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करत आहेत.
मुंबई पोलीस कायदा हा २ जानेवारी १९५१ साली अस्तित्वात आला होता व त्याचे महाराष्ट्र पोलीस कायद्यात १९५२ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. तेव्हापासून २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने २ ते ८ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी अंबरनाथमधील भाऊसाहेब परांजपे शाळा, महात्मा गांधी विद्यालय तसेच अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी पोलीस ठाण्यातील कामकाज, तक्रार कशी करावी, शस्त्रे, कोठडी, सायबर गुन्हे याचबरोबरीने एका जागरूक नागरिकाने कोणती काळजी घ्यावी, घडलेल्या गुन्ह्य़ाची माहिती पोलिसांना कशी द्यावी? अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
महिला मेळावा
तसेच शहरातील महिलांचा मेळावा व ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजातील वाईट प्रवृत्तींवर वचक ठेवण्यासाठी सदैव सतर्क असलेल्या पोलिसांशी ते ज्या नागरिकांसाठी लढताहेत त्यांना याबाबत माहिती व जागृती व्हावी या उद्देशाने स्थापना दिनाचे औचित्य साधत विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधल्याचे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महिलांचे मनोबल खच्चीकरण करण्यासारखे गुन्हे सध्या घडत आहेत. याला आळा बसण्यासाठी या स्थापना दिन सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही महिलांशी संवाद साधत त्यांना या गुन्ह्य़ांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच सध्या जोरात दुचाकी हाकणारी युवा मुले, चैनीचे आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडून होणारी पैशांची वारेमाप उधळपट्टी व त्यासाठी त्यांनी पत्करलेला गुन्हेगारीचा मार्ग आदी चुकीच्या गोष्टींबद्दल आम्ही शालेय विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.
-वसंत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार