दिवाळी आली की खर्च आला आणि या वाढत्या खर्चाची तजवीज करायची म्हणजे चाकरमान्यांना बोनस आठवतो. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसची चर्चा याच काळात रंगलेली दिसते. असंघटित कामगार तसेच व्यावसायिक मात्र या चर्चेत कुठेच नसतात. असे असताना बदलापुरातील एका रिक्षाचालक संघटनेने राबविलेल्या अभिनव उपक्रमातून तेथील रिक्षाचालकांना एकत्रितपणे वाटण्यात आलेला २१ लाख रुपयांचा बोनस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रिक्षाचालक-मालक संघाच्या वतीने सुमारे दशकभरापासून सुरू असलेल्या ‘दिवाळी बोनस’ योजनेमुळे यंदाची दिवाळी बदलापुरातील रिक्षाचालकांसाठी घसघशीत लाभाची ठरणार आहे. वर्षभर केलेली बचत रिक्षाचालक संघाकडून दिवाळीत रिक्षावाल्यांना बोनस म्हणून देण्यात येते. बदलापूर पूर्वेकडील रिक्षाचालक-मालक संघाने चालू केलेल्या या उपक्रमामुळे रिक्षावाल्यांना दिवाळीच्या तोंडावर फायदा मिळत असून ही ‘दिवाळी बोनस’ योजना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.
बदलापूर पूर्वेकडील रिक्षाचालकांना दैनंदिन बचतीची सवय लागावी या उद्देशाने येथील रिक्षाचालक-मालक संघाचे अध्यक्ष अविनाश खिलारे यांनी २००४ मध्ये दिवाळी बोनस योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. रिक्षाचालकांनी त्यांच्या दररोजच्या कमाईतील त्यांना शक्य होईल ती रक्कम चालक-मालक संघाकडे जमा करायची आणि संघाने दिवाळीला ही रक्कम बोनस म्हणून द्यायची, असे ठरले. त्याचबरोबर भेटवस्तूही द्यायची असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेच्या माध्यमातून यंदा शिवाजी चौकातील बाळा म्हसकर या रिक्षाचालकाने त्याच्याच कमाईतील; परंतु काहीसा आगळावेगळा सुमारे ५८ हजार रुपयांचा बोनस मिळवला आहे. कात्रपमधील रिक्षाचालक मनोज फाटक यांनी ४० हजार रुपये तर दत्तवाडीतील रिक्षाचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी ३८ हजार रुपये बोनस मिळवला आहे. या वर्षी या योजनेत २५६ रिक्षाचालक सहभागी झाले होते. त्यांना सर्वाना मिळून २१ लाख रुपयांची रक्कम बोनस म्हणून वाटप करण्यात आली आहे.

रिक्षावाल्यांना किती बोनस मिळाला यापेक्षा या योजनेच्या निमित्ताने रिक्षाचालकांमध्ये बचतीची सवय लागते आहे हे खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला २००४ मध्ये फक्त १८ रिक्षाचालक या योजनेमध्ये सहभागी झाले होते. परंतु आता ही संख्या वाढत आहे.
– अविनाश खिलारे, अध्यक्ष, बदलापूर पूर्व रिक्षाचालक-मालक संघ