बदलापूरः बदलापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घेतला आहे. कात्रप पेट्रोल पंप ते खरवईपर्यंत नियोजीत असलेला पनवेल मार्ग सध्या अपूर्ण आहे. ज्युवेली ते खरवई या बाह्यवळण रस्त्याच्या उर्वरीत काँक्रिट रस्त्याच्या उर्वरित भागाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी एमएमआरडीएने निविदा जाहीर केली आहे. सध्या हा मार्ग विस्तारीत बदलापुरच्या नागरिकांसाठी महत्वाचा ठरतो आहे. या भागात रहिवासी संकुलांसोबतच हॉटेल्स, शाळाही उभ्याव राहिल्या आहेत. विरंगुळ्यासाठी हा रस्ताही बदलापुरकर सध्या वापरतात.
बदलापूर शहर गेल्या काही वर्षांत वेगाने वाढले आहे. लोकसंख्या, घरांची संख्या आणि वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी बदलापूर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर कोंडी होत असते. बदलापूर पूर्वेतून जुना पुणे लिंक रस्ता जातो. यावर शहरांतर्गत वाहतुकीसह इतरही वाहतूक असते. शहराचा हा मध्यातून जात असल्याने येथून शहरातील इतर वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत असते. या वाहतुकीला पर्याय देण्यासाठी काही वर्षांपूर्वी कात्रप पेट्रोप पंप ते खरवई असा बाह्यवळण रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचे काम गेल्या काही वर्षात पूर्ण झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात निम्माच रस्ता तयार करण्यात आला. कात्रप पेट्रोल पंपापासून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र काही किलोमीटर अंतरावर खदानीपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला. त्यापुढे हा मार्ग तयार झालेला नाही. या रस्त्यामुळे या भागात रहिवासी इमारती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्यांना हा मार्ग फायदेशीर ठरला. येथे अनेक हॉटेलही सुरू झाले आहेत.
मात्र कात्रप ते खरवई ज्युवेली हा मार्ग पूर्ण झाला नसल्याने शहरातील वाहनचालक त्याचा वापर करून शकत नाही. पर्यायाने शहरातून जाणाऱ्या जुने पुणे लिंक रस्त्यावरून होणारी वाहतूक जैसे थे आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने या मार्गाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या उर्वरित मार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. हा मार्ग तयार झाल्यामुळे यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटेल. भविष्यात बडोदे महामार्ग, नवी मुंबई ते बदलापूर नवा प्रवेश नियंत्रित (एक्सेस कंट्रोल)हा रस्ता बनल्यास याच मार्गाने पनवेल, ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे.