बदलापूर : बदलापूर शहरातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या बेलवली भागातील रेल्वे भुयारी मार्ग सोमवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या भुयारी मार्गात २६ मे रोजी एक चारचाकी पाण्यात अडकल्यानंतर येथील जोड रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले होते. हा मार्ग बंद असल्याने बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत होता.
बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. त्या तुलनेत बदलापुर शहरात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मार्गांची उभारणी झाली नाही. बदलापूर शहरात दोन दशकांपूर्वी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. तर बेलवली भागात रेल्वेचा भुयारी मार्ग उभारण्यात आला. या मार्गात सातत्याने पाणी साचते. त्यामुळे येथील वाहतूक बंद होते. मात्र ज्या वेळी हा मार्ग सुरू असतो त्यावेळी असंख्य लहान वाहने, शाळेच्या बस, रिक्षा या मार्गातून प्रवास करतात. हा वाहनांचा भार शहरातील एकमेव उड्डाणपुलावर पडत नाही.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बदलापूर शहराला पावसाने झोडपले. त्यावेळी २६ मे रोजी या भुयारी मार्गात पाणी साचले होते. एका चारचाकी चालकाने धाडस करत यात वाहन घातले. मात्र पाणी अधिक असल्याने चारचाकी वाहन पाण्यात अडकून पडले. चालकाने कसाबसा जीव वाचवला. त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकी बाहेर काढली. मात्र त्यानंतर हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला. भुयारी मार्गाला जोडणाऱ्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांच्या जोड रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे भुयारी मार्ग जवळपास २५ दिवस बंद होता. या काळात शहरातील वाहतूक एकमेव उड्डाणपूलावर होत होती. परिणामी दिवसातून अनेक वेळा या उड्डाणपुलावर कोंडी होत होती. तासनतास अनेक वाहने अडकून पडत होती. शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. त्यामुळे भुयारी मार्ग तातडीने सुरू करायची मागणी होत होती.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सोमवारी सायंकाळी याची पाहणी करत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहनांच्या संख्येत काही अंशी घट झाली असून नागरिकांचा फेराही वाचला आहे. भुयारी मार्ग खुला झाल्याने शहरातील उड्डाणपुलावरच्या कोंडीवर परिणाम होईल अशी आशा आहे. मात्र त्याचवेळी शहरात नवा उड्डाणपुल तातडीने उभारण्याची मागणीही जोर धरते आहे.