समाजमाध्यमांवर भाजपला समर्थन केल्याचे वृत्त; मात्र ठाकूर म्हणतात, अद्याप निर्णय नाही
वसई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू असून अपक्षांसह विविध लहान पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहेत. पालघर जिल्ह्य़ात तीन जागा पटकावणाऱ्या बहुजन विकास आघाडीलाही (बविआ) महत्त्व प्राप्त झाले असून त्यांचा पाठिंबा कुणाला हे अजून गुलदस्त्यातच आहे. समाजमाध्यमांवर बविआने भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रसारित झाले असले तरी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी भूमिका घेतलेली आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवेसना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी अपक्ष आणि स्थानिक पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघांत विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन आमदार असलेल्या बविआला महत्त्व प्राप्त झाले आहे. बविआ हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा घटक आहे. मात्र आता बविआ सत्तासंघर्षांत कुणाच्या बाजूने जाणार यावर वसईत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, बविआने भाजपाला समर्थन दिल्याचे समाजमाध्यमावर पसरवण्यात आले आहे. बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र सध्या आमच्या पक्षाने कुणालाच पाठिंबा दिलेला नसल्याचे सांगितले. सध्या मी घरी असून लोकांना भेटत आहे. सत्तास्थापनेला अजून वेळ असून बऱ्याच राजकीय उलथापालथी होतील, त्यानंतर पाठिंबा कुणाला द्यायचे ते ठरवू, असे ते म्हणाले.
शिवसेनेमुळे पाठिंबा देण्याची शक्यता कमी?
गेल्या निवडणुकीच्या वेळी बविआ महाआघाडीचा घटक होता. त्या वेळीही बविआने भाजपाला पाठिंबा दिला होता. शिवसेनेने मागील लोकसभा पोटनिवडणुकीसापासून टाकूर यांच्याविरोधात हल्लाबोल केला होता. त्यामुळे बविआ शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. भाईंदरच्या भाजप बंडखोर गीता जैन निवडून आल्या आहेत. त्यांनीही हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये भेट घेऊन पुढील निर्णयासंदर्भात चर्चा केली.