कल्याण : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात एका लाॅजजवळ एका बांग्लादेशी महिलेला अटक केली आहे. ठाणे येथील कळवा तलावापाडा भागात राहणाही ही बांग्लादेशी महिला मागील १५ वर्षापासून भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना आढळले. या महिलेचा जन्म बांग्लादेशातील असूनही तिने भारतात राहून आधारकार्ड काढले असल्याबद्दल पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.या बांग्लादेशी महिलेजवळ एक महागडा मोबाईल पोलिसांना सापडला. त्यामध्ये विविध उपयोजन उघडल्याचे पोलिसांना दिसले. या महिलेजवळ भारतीय वास्तव्याचे पारपत्र, व्हिसा आढळून आला नाही. मजिदा रसूल शेख (३५) असे या महिलेचे नाव आहे. ती ठाणे कळवा भागात तलावापाडा भागात एक परप्रांतीयाच्या भाड्याच्या खोलीत राहते. ती कामासाठी कल्याणमध्ये येत होती.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात एका लाॅजजवळ एक बांग्लादेशी महिला येणार आहे, अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार अनुप कामत यांना मिळाली. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली. शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शाखा पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, हवालदार सचिन वानखेडे, महिला हवालदार कुंभारे यांना घटनास्थळी सापळा लावण्याचे आदेश दिले. ठरल्या वेळेत संबंधित बांग्लादेशी महिला येताच, गुप्त बातमीदारीने हीच ती महिला असल्याचे सापळा लावून बसलेल्या पोलिसांना खुणावले.
महिला हवालदार कुंभारे यांनी मजिदा शेख या बांग्लादेशी महिला रोखून धरून अटकाव केला. या महिलेने पोलिसांच्या तावडीतून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिला सोडण्यात आले नाही. पोलिसांनी या महिलेजवळ भारतीय निवासाचे पारपत्र, व्हिसा आणि इतर कागदपत्रे मागितली. ती कोणतीही कागदपत्रे देऊ शकली नाही. तिने भारतात राहण्यासाठी आधारकार्ड दाखवले. हे आधारकार्ड भारतात काढले असल्याचे पोलिसांना आढळले. हे आधारकार्ड कोठे काढले याविषयी तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. या महिलेचा जन्म बांग्लादेशचा असताना तिने भारतात आधारकार्ड कसे काढले याविषयी पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.
पोलिसांनी या महिलेच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात विविध उपयोजना आणि ती व्हिडीओ संपर्कातून बांग्लादेशातील एक इसम आणि आपल्या मुलांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले.
मागील १५ वर्ष भारतात कोणत्याही कागदपत्रा विना ही महिला भारतात वास्तव्य करत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तिच्या विरुध्द विदेशी व्यक्ति अधिनियम, पारपत्र अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील सात ते आठ महिन्यात कल्याण डोंबिवली परिसरातून सुमारे ५० हून अधिक बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.