बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी नेत असलेली ५१ लाख रुपयांची रक्कम बँकेच्याच कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना वसईत उघडकीस आली आहे. वालिव पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. कामण येथे सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.
एचडीएफसी बँकेतर्फे त्यांच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचे काम सायंटिफिक सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेस या कंपनीला देण्यात आले आहे. बँकेचा गार्ड, कर्मचारी (कस्टोडियन), तसेच खासगी सिक्युरिटी कंपनीचा सुरक्षा रक्षक असे या व्हॅनमध्ये असतात. सोमवारी संध्याकाळी ही व्हॅन बँकेतून एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी निघाली होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नायगाव कामण येथील एका एटीएममध्ये त्यांनी पैसे भरल्यानंतर व्हॅन चिंचोटीच्या दिशेने निघाली. या वेळी कर्मचारी स्वप्निल जोगळे याने काही हिशोब करायचा असून अन्य कर्मचारी येणार असल्याचे सांगून व्हॅन थांबवली. त्याने इतरांना बॅगेत पैसे भरण्यास सांगितले. ऑडिटरला फोन करण्याचा बहाणा करत खाली उतरला आणि पैशांची बॅग घेऊन पसार झाला. बराच वेळ झाला तरी स्वप्निल परत आला नसल्याने त्यांनी त्याला फोन केला तर तो बंद होता. त्यामुळे त्यांनी बँकेत कळवले. स्वप्निलचा शोध घेण्यास सुरुवात केली पण त्याचा संपर्क झाला नाही. यामुळे बुधवारी सकाळी बँकेतर्फे वालिव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वालिव पोलिसांनी त्वरित या प्रकरणाचा तपास सुरू केला. अद्याप आरोपी सापडलेला नाही. आम्ही रत्नागिरी येथून आरोपीच्या भावाला आणि पत्नीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे लुटलेल्या रकमेतील काही रक्कम सापडल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.