अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पाणीपुरवठा स्रोत असलेले बारवी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १२ वाजता बारवी धरणाची पाण्याची पातळी ७२.४० मीटरवर पोहोचली होती. म्हणजे सध्या धरणात ९७.८३ टक्के इतका पाणीसाठा आहे.
धरणाची कमाल पातळी (ओव्हरफ्लो लेव्हल) ७२.६० मीटर आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास, येत्या काही तासांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास त्याचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होतो.
ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणारे बारवी धरण भरण्याकडे जिल्ह्याचे डोळे लागलेले असतात. नागरी वापरासह, औद्योगिक वापरासाठी बारवी धरणाचे पाणी वापरले जाते. बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी पुढे आपटी बंधाऱ्याजवळून उचलून ते जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तिथे त्यावर प्रक्रिया करून जलवाहिन्यांद्वारे शहरे, उद्योगांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरण मे महिन्यातच भरण्यास सुरूवात झाली. बाष्पीभवनाच्या काळात धरणात पाणी साठा होऊ लागला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षात धरण लवकर भरेल अशी आशा होती. मात्र मे, जून महिना पूर्ण कोसळल्यानंतर जुलैच्या अखेरीस पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर तो की प्रमाणात पडला. त्यामुळे बारवी धऱण भरण्याचा वेग मंदावला.
आता बारवी धरण क्षमतेच्या ९७.८३ टक्के इतके भरले आहे. एमआयडीसी प्रशासनाने मंगळवारी दुपारी १२ वाजता धरणाची पाणी पातळी ७२.४० पर्यंत आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे पाऊस सुरू राहिल्यास धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. बारवी धरणाला गोडबोले पद्धतीचे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने आल्यास त्याचा विसर्ग आपोआप सुरू होतो. त्यामुळे मंगळवारी बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुष्यंत उईके यांनी पत्राद्वारे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या गावांना सतर्कतेचे आवाहन
बारवी नदीकाठच्या आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोंण, राहटोली, आधाणवाडी, फणसवाडी, वाकडचीवाडी तसेच इतर परिसरातील नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो, त्यामुळे पर्यटक, पोहणारे, मासेमारी करणारे व नदीकिनारी जाणारे सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.