बदलापूर: पावसाळा जवळ आला की ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांना, प्रशासकीय संस्थांना वेध लागतात ते बारवी धरण भरण्याचे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले तर वर्षभर पाणी उपलब्ध होते. मात्र बारवी धरण वाहू लागले की बारवी नदी, उल्हास नदी काठच्या ग्रामस्थांची झोप उडते. एकाच वेळी समाधान आणि चिंता निर्माण करणारे हे बारवी धरण नक्की आहे तरी कुठे, ते कुणी उभारले, ते कधी उभारले गेले आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि अंबरनाथ या दोन तालुक्यांच्या वेशीवर उभारण्यात आलेले बारवी धरण हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचे धरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राने औद्योगिक धोरण तयार केले. त्यानंतर उद्योगांसाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्याचेही ठरवण्यात आले. त्यावेळी पाण्याची मालकी असलेला स्त्रोत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून बारवी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मुंबईच्या जवळचा जिल्हा असल्याने महत्त्वाचा आहे. मुंबईला कार्यरत ठेवण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींसाठी ठाणे जिल्हा हा साहाय्यकारी आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी! मुंबई मधील लोकवस्ती जेव्हा वाढत विस्तारत गेली तसतसे मुंबईतील उद्योग व्यवसाय, कारखाने यांचे मुंबई शेजारील जिल्ह्यांमध्ये स्थलांतर होत गेले. औद्यगिक वापरासाठी पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जेव्हा येथे औद्योगिक वसाहती विकसित करण्याचे धोरण स्वीकारले तेव्हा औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या अखंडित उपलब्धतेसाठी याच ठाणे जिल्ह्यातील बारवी नदीवर धरण बांधून पाणीसाठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात औद्योगिककरणाची पायाभरणी केली. दुसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि त्यांच्या मंत्रीमंडळात असलेले उद्योगमंत्री स. गो. बर्वे या तिघांच्या द्रष्टेपणामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक राज्याचा प्रवास सुरू झाला.
बारवी आधी मुंबईच्या यादीत
मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याची भविष्यातील तहाण भागवण्यासाठी धरणे बांधण्याच्या यादीत बारवी धरणाचा समावेश होता. मात्र बृहन्मुंबईच्या सर्व पाणी योजना या गुरूत्वबल (GRAVITY BASED) होत्या. १९६६ ते १९९० पर्यंत मुंबईला ३५० दशलक्ष गॅलन प्रतिदिन पाणी हवे होते. तर मुंबईच्या पाच योजनांमधून ९५० पाणी मिळणार होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या यादीतून बारवी आणि काळू धरण वगळले गेले. त्याचवेळी औद्योगिक धोरणांमुळे उद्योगांसाठी सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असलेला महसूल आणि अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकाम महामंडळाला मिळाला. त्यातून बारवी धरणाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आली आणि त्यासाठी त्यांनी सुरूवात केली.

बारवी धरणाच्या तांत्रिक सर्वेक्षणाचे काम पी. आर. टोणगावकर यांच्या अभियांत्रिकी संस्थेला देण्यात आले. त्यांनी १९६६ साली याचा सर्वांगिण प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला. त्यानंतर या धरणाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. पिंपळोली गावाच्या वेशीवर दोन डोंगरांच्या मध्ये योग्य जागेत या धरणाची उभारणी केली गेली. पहिल्या टप्प्यात ५० दशलक्ष गॅलन प्रतिदिन हे ध्येय निश्चित करण्यात आले होते. १९७२ मध्ये बारवी धरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. २०२२ या वर्षात बारवी धरणाच्या उभारणीला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ‘गोष्ट बारवीची’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले होते. त्यात बारवी धरणाचा सविस्तर इतिहास, त्यासाठी लागलेले श्रम, जैवविविधता, पुनर्वसन अशा सर्व गोष्टींची धांडोळा घेण्यात आला आहे.
आता मुंबईची महामुंबई झाली असली तरीही महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या बारवी धरणाची गुंतवणूक आजतागायत औद्योगिक आणि घरगुती वापराचा पाणीसाठा उपलब्ध करून देऊन फलदायी परतावा देत आहे. धरणांची निर्मिती आणि त्यासाठी लागणारी जमीन संपादन करताना होणारे विस्थापन याचा विचार करता बारवी धरण प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे.
बारवी धरणाची पाणी साठा करण्याची आजची सर्वोच्च क्षमता सुमारे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. ती एकाच टप्यात झाली नाही. १९७२ मध्ये पहिल्या टप्प्यात १३०.४० दशलक्ष घनमीटर, दुसऱ्या टप्प्यात १९८० मध्ये १७८.२६ दशलक्ष घनमीटर, त्यानंतरच्या अतिरिक्त टप्प्यात १९९८ मध्ये २३४.२६ तर २०१९ साली तिसऱ्या शेवटच्या टप्प्यात १०६ दशलक्ष घनमीटरची वाढ होऊन ती सुमारे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पर्यंत पोहचली आहे. राज्यातील सर्व मोठमोठ्या धरणांच्या बांधणीत आणि त्यामुळे झालेल्या जमीन विस्थापितांच्या अडचणीं दूर करण्यामध्ये बारवी धरणाचे सूत्र हे आदर्श आणि मार्गदर्शक मानले जाते. याचे श्रेय कोणा एकाचे नाही तर निर्णय ते अंमलबजावणी या प्रवासात पूर्ण योगदान देणाऱ्या सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी, तंत्रज्ञ, अभियंते, कर्मचारी, कामगार, मजूर, विस्थापित जमीन मालक या सर्वांचे आहे.

या एका धरणाच्या सुयोग्य नियोजनाने झालेल्या निर्मितीमुळे, जल संवर्धन, जल संरक्षण, पाणीसाठा क्षमता, औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी पाणी पुरवठा, जैवविविधता संरक्षण, पर्यावरण संर निर्मिती, औद्योगिक उत्पादन वाढ, आर्थिक सधनता, नि अनेक बाबींमध्ये मोठी उपलब्धी मिळाली.
उल्हास नदी असताना बारवीवर धरण का ?
बारवी नदीचा ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील उगम होतो. ती पुढे जाऊन उल्हास नदीला मिळते. उल्हास या मोठ्या नदीची ती उपनदी आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हासनदीवर धरण बांधण्यासाठी योग्य भौगोलिक रचना नाही. त्यामुळे बारवी योग्य पर्याय ठरला. बारवीचे पाणी वसत शेलवलीजवळ उल्हास नदीला येऊन मिळते. तिथून ते पाणी उचलून जांभूळ येथे नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते.
बारवीचे दरवाजे कसे उघडतात ?
कल्याण, अंबरनाथ तालुक्यात अधिकचा पाऊस झाल्यास सर्वांच्या तोंडी एकच प्रश्न असतो. बारवी धरणाचे दरवाजे उघडणार आहेत का. तर यावरून अनेक अफवाही पसरतात. २६ जुलै २००५च्या महापुरानंतर २७-२८ जुलैला अशीच एक अफवा पसरली होती, की बारवी धरण फुटले. त्यानंतर मोठा हाहाकार झाला होता. अनेकांनी डोंगरावर धाव घेतली होती. मात्र सुदैवाने ही अफवाच ठरली. मात्र बारवी धरणाचे दुसरे वैशिट्य म्हणजे य पावसाळ्यातील अतिवृष्टीत धरणातील पाणीसाठा धरण भरून वाहू लागते. अशा वेळी अनेक धरणांचे परिश्रमाने उघडावे लागतात. बारवी धरणात मात्र ही यंत्रणा नियंत्रित आहे. ही विकासाला लाभलेली तंत्रज्ञानाची जोड आहे. येथे स्वंयचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्यात पाण्याचा जितका प्रवाह वाढतो तितका तो त्या स्वयंचलित दरवाज्यांमधून प्रवाहित होऊन निघून जातो.
गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वनद्या आणि त्यावरील मोठी धरणे यांच्या तुलनेत बारवी ही अतिशय छोटी नदी व त्यावरील हे अगदी लहान धरण आहे. परंतु मूती लहान तरी कामगिरी महान या उक्ती प्रमाणे बारवी धरणाने गेल्या ५० वर्षांत ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि लोकवस्तीची पाण्याची गरज संपूर्णतः भागवलेली आहे.उद्योगांसाठी बांधले आणि शहरांसाठी वरदान ठरले
औद्योगिक वसाहतींसाठी बारवी धरणाची उभारणी करण्यात आली. मात्र कालांतराने वाढलेली नागरी मागणी, इतर नव्या पर्यायांवर न झालेले काम अशा सर्व कारणांमुळे बारवी धरण सध्या वरदान ठरते आहे. वसई आणि भिवंडी वगळता इतर सर्व औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातूनच पाणी उपलब्ध होते. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती वापरासाठीही बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. गेली ५० वर्षे औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ठाणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे.
(संदर्भ – गोष्ट बारवीची, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)