लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथः अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शिवमंदिराच्या परिसर सुशोभीकरणात प्रवेशद्वारापासून नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर, भक्त निवास ते स्वच्छतागृहापर्यंतच्या विविध कामांसाठी नुकतीच निविदा जाहीर केली आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार येथे विकास काम केले जाणार असून त्या दर्जाच्या कंत्राटदाराचा पालिकेला गरज आहे. कार्यादेश दिल्यापासून दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील शिलाहारकालिन इतिहासाची साक्ष देणारे आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचे संवर्धन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रक्रियेत होता. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने या शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने १३८ कोटी २१ लाख किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सुशोभीकरणाच्या प्रत्यक्ष कामासाठी पुरातत्व खात्याची मंजुरी आवश्यक होती. अंबरनाथ नगरपालिकेच्या वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व खात्याने काही महिन्यांपूर्वी मंदिर परिसरातील शंभर मीटरबाहेरच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यात मंदिर परिसरातील घाटापासून विविध सुविधा मंदिराच्या परिसरात उभारल्या जाणार आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत गृह प्रकल्पाच्या उद्वाहन खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवमंदिर हे धार्मिक स्थळ असले तरी येथील स्थापत्य कलेचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासक येत असतात. त्यादृष्टीने पर्यटन स्थळ म्हणूनही अंबरनाथच्या या शिवमंदिराचा विकास करण्याची संकल्पन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेने मंगळवारी शिवमंदिराच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी अखेर निविदा जाहीर केली आहे. १०७ कोटी रूपयांच्या या निवेदेच्या माध्यमातून परिसरातील विविध कामे केली जाणार आहेत. येत्या दीड वर्षात ही कामे मार्गी लावली जाणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.