ठाणे : भिवंडी येथे पाच जनावरांना कत्तलीसाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन गाई आण तीन वासरांचा सामावेश होता. वासारांचे वय प्रत्येकी एक वर्ष होते. या सर्व जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या गाईंचे आणि वासराचे चारही पाय बांधून ठेवले होते. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोमान मुरुमकर आणि सिमाव पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे.
भिवंडी वडपे मार्गावर पडघा पोलिसांचे पथक मंगळवारी मध्यरात्री गस्ती घालत होते. त्यावेळी अर्जुनली गावाच्या शिवारातील एका गोठ्यामध्ये कत्तलीसाठी गाई आणल्याची माहिती पथकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक डी.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यरात्री एका खासगी वाहनाने गोठ्याच्या दिशेने प्रवेश केला. पोलिसांचे पथक गोठात पोहचले असता, गोठ्यामध्ये पाच जनावरे पोलिसांना आढळून आली.
गाईंना क्रुरतेने होते बांधले
पोलिसांनी या गोठ्यामध्ये जाऊन पाहणी केली असता, या जनावरांना अतिशय क्रूरतेने बांधण्यात आल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. गोठ्यामध्ये पोलिसांना आढळून आलेल्या गाईंमध्ये दोन गीर जातीच्या गाई आणि तीन वासरांचा सामावेश होता. त्यांचे चारही पाय बांधून ठेवले होते. तसेच त्यांचे तोंड दोरीने खुट्याला बांधले होते. यामध्ये पाच वर्षांची आणि चार वर्षांची प्रत्येकी एक-एक गाय आणि प्रत्येकी एक वर्षांच्या तीन वासरांचा सामावेश होता. पोलिसांनी गाई आणि वासरांना एका खासगी वाहनाने आनगाव येथील गोपाळ शाळामध्ये नेले.
गुन्हा काय दाखल
याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्याचे पोलिसांनी स्वत: फिर्याद दाखल केली आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११ (१), ११ (१) (एफ), ११ (१) (एच), ११ (१) (आय), ११ (१) (क), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ५ (ए),५बी, ९ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ -३ (५) प्रमाणे नोमान मुरुमकर आणि सिमाव पटेल या दोघांविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक डी.एम. देशमुख यांनी केला. या गाई कुठून आणल्या आणि त्या कोणाला विक्री केल्या जाणार होत्या, त्याचा तपास पडघा पोलिसांकडून सुरु आहे.