पाच दिवसांपूर्वी ‘भिवंडी श्री’ हा किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू रवी सावंत (वय ३५) याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रवी सावंत याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई – वडील असा परिवार आहे.
भिवंडीत राहणारा रवी सावंत हा जिल्ह्यातील प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू होता. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीमधील अनेक स्पर्धांमध्ये त्याने छाप पाडली होती. महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने उरण येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत तिसऱ्या गटात रवी सावंत याने सुवर्ण पदक पटकावले होते. या पदकासह त्याची भारत श्री या स्पर्धेसाठी निवड देखील झाली होती. काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरात ‘भिवंडी श्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रवी सावंत याने ‘भिवंडी श्री’ हा किताब पटकावला होता.
मंगळवारी सकाळी रवी सावंतला ह्रदयविकाराचा झटका आला आणि यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने भिवंडीतील क्रीडा वर्तुळात शोककळा पसरली असून रवी सावंत यांच्या अंत्यसंस्कारासाठी शहरातील नागरिक आणि राजकीय नेते उपस्थित होते.