सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा उघड

किशोर कोकणे, ठाणे</strong>

भिवंडी येथील नारपोली, पूर्णा, राहनाळ, अंजूरफाटा या भागांत पडलेले खड्डे बुजवणे सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य झाले नसल्याने अक्षरश: जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे खड्डय़ांमुळे अपघातात एखादा बळी जाऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीसच फावडा आणि घमेले घेऊन चौका-चौकांतील खड्डे बुजवीत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही वेळ आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

भिवंडी येथील नारपोली भागात हजारो गोदामे असल्याने या भागातून दररोज सुमारे १० ते १२ हजार जड-अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच पावसाळा सुरू झाल्यापासून येथील पूर्णा, राहनाळ, अंजूरफाटा, नारपोली या मुख्य मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. यातील अनेक खड्डे हे सहापेक्षा अधिक मीटर लांबीचे तर, दीड मीटर खोल इतके मोठे आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. खड्डय़ांमुळे या मार्गावरील वाहतूक कमालीची मंदावली आहे. कोंडी दूर व्हावी यासाठी वाहतूक पोलीस एका बाजूची वाहतूक रोखून धरतात आणि दुसऱ्या बाजूकडील वाहनांना मार्ग मोकळा करून देतात. दररोज ही कसरत सुरू असल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. हे खड्डे बुजवण्यासाठी खड्डय़ांबाबत वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र पत्रव्यवहार करूनही ठोस भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात येत नसल्याने अखेर वाहतूक पोलिसांकडूनच ठिकठिकाणी पडलेले चौकातील खड्डे बुजविण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी भिवंडी शहर तसेच महामार्गावरील खड्डय़ात गाडी उलटल्याने काही दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले होते. भिवंडी शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. असे असले तरी महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहतूक पोलिसांच्या पाठपुराव्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याने वाहतूक पोलीस रेती आणून स्वत: फावडा आणि घमेले घेऊन खड्डे बुजवताना दिसत आहेत. यासंबंधी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.

भिवंडीत मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडूनही खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.