ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबरला लोकार्पण होणार आहे. परंतु विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला असून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी सरकारला इशारा दिला आहे. दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय झाला नाही तर ६ ऑक्टोबरला मोर्चा काढू असे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच या मोर्चात दोन ते तीन लाख भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी होतील असा दावाही त्यांनी केला.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे अशी मागणी ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील भूमिपूत्र करत आहेत. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला होणार आहे. परंतु विमानतळाच्या नावाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे बुधवारी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता.मी त्याचा पाठपुरावा केल होता, दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याचे उत्तर केंद्र सरकारकडून मिळाले होते. येत्या ८ ऑक्टोबरला विमानतळाचे लोकार्पण होणार आहे.

अद्यापही विमानतळाच्या नावाबाबत निर्णय झालेला नाही असा आरोप म्हात्रे यांनी केला. जुलै महिन्यातील अधिवेशनात हा प्रश्न उपस्थितीत केला होता. आता उदघाटन जवळ आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव असावे, अशी आमची मागणी आहे. दि.बा. पाटील यांच्या नावाचा निर्णय झाला नाही तर भूमिपूत्र एकत्र येऊन ६ ऑक्टोबरला मोर्चा काढून आंदोलन करतील.

हा मोर्चा कारावे ते विमानतळ असा असेल. यात दोन ते तीन लाख भूमिपूत्र सहभागी होतील असा इशारा म्हात्रे यांनी दिला. येत्या ७ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. या विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो असेही म्हात्रे म्हणाले.

चौकट – काहीदिवसांपूर्वीच कृती समितीची एक बैठक झाली होती. त्यावेळी दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ठरले होते. त्याची जबाबदारी वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर होती. परंतु १० दिवस झाले अद्यापही मुख्यमंत्री भेट देत नाहीत. यातील अडचण काय आहे कळत नाही असा आरोपही म्हात्रे यांनी केला.