ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागात टोरंट पाॅवर कंपनीकडून वीज वितरणाचे काम केले जाते. टोरंट पाॅवर मार्फत सुरक्षा ठेव रक्कम ग्राहकांकडून आकारली जात आहे. ही ठेव भरू नका असे आवाहन राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केले आहे. तसेच सुरक्षा ठेव भरण्यासाठी तगादा लावला तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही ते म्हणाले. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे आहेत. या मतदारसंघातील भिवंडी शहरामध्ये आणि काही ग्रामीण भागात वीज वितरण टोरंट कंपनीकडून केला जातो. टोरंट पॉवर कंपनीने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या सूचना केल्या आहेत. ही रक्कम दीड हजार रुपयांपासून ते साडेपाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. लवकरात लवकर ही रक्कम भरण्याच्या सूचना व मोबाईलद्वारे संदेश टोरंट पाॅवर कंपनीकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणानंतर सुरेश म्हात्रे यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वीज देयक भरतानाच हैराण झालेल्या वीज ग्राहकांना आता पुन्हा सुरक्षा ठेव नावाने हजारो रुपये वीज वितरण कंपनीला द्यावे लागणार असल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर भिवंडी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी टोरंट पॉवर कंपनीने आकारलेला अतिरिक्त सुरक्षा ठेव भरू नये, टोरंट पाॅवर कंपनीने आकारलेली ही रक्कम पूर्णत: बेकायदेशीर आहे. जर टोरंट पाॅवर कंपनीने वीज ग्राहकांना त्रास दिला अथवा रक्कम भरण्यासाठी तगादा लावला तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील म्हात्रे यांनी नागरिकांना केले आहे.