ठाणे : भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास वारंवार मुदत देऊनही असमर्थता दाखविणाऱ्या ४५ थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या असून या कारवाईनंतरही थकबाकीदार मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यातील ३२ मालमत्ता प्रशासनाने नाममात्र दराने ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व अनिवासी मालमत्ता आहेत. या शिवाय, थकबाकी असलेल्या ५८५ थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. या कारवाईच्या निमित्ताने पालिका प्रशासनाने थकबाकीदारांना दणका दिल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी महापालिकेने मालमत्ता करासह इतर करांच्या वसुलीवर गेल्या दोन वर्षांपासून भर दिला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु या आवाहनाकडे काही मालमत्ताधारक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या अशा थकबाकीदारांविरोधात पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत ४५ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांधारकांना थकीत करापोटी मागणी बिल, मागणी नोटीस, जप्तीचे अधिपत्र बजावूनही त्यांनी थकीत कराच्या रक्कमेचा भरणा पालिकेकडे केलेला नाही. त्यामुळे ४५ पैकी ३२ मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु लिलाव प्रक्रीयेस प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने या ३२ मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेतल्या आहेत.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात पुन्हा करोनाची धास्ती; केवळ पंधरा दिवसांत १२६ नव्या रुग्णांची नोंद

भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या ५८५ मालमत्ताधारकांची प्रशासनाने यादी तयार केली असून त्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता कराचा भारणा करून संबंधित मालमत्ताधारकांनी जप्तीची तसेच लिलावाची प्रक्रीया टाळून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु या आवाहनाकडे थकबाकीदार कानाडोळा करत थकीत कर भरण्यास असमर्थता दाखवित असल्याचे चित्र आहे. यामुळेच पालिका प्रशासनाने अशा थकबाकीदरांंच्या मालमत्ता जप्त करून त्या लिलाव राबविण्यास सुरुवात केली असून त्यास प्रतिसाद मिळला नाहितर त्या नाममात्र दराने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे.

हेही वाचा… कल्याण तालुक्यात पावसाची रिमझिम; भाजीपाला, हरभरा लागवड शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थकीत मालमत्ता कर भरण्यास वारंवार आवाहन करूनही थकबाकीदारांनी कराचा भारणा केलेला नाही. त्यामु‌ळे कायदेशी प्रक्रीया पुर्ण करून या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेतल्या असून या सर्व अनिवासी मालमत्ता आहेत. पहिल्यांदाच नाईलाजास्तव अशाप्रकारची कारवाई करावी लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी इतर थकबाकीदारांनी अभय योजनेंतर्गत थकीत कराचा तात्काळ भारणा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.