ठाणे : भिवंडी शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून यावरून पालिका प्रशासनावर टिका होत आहे. त्यातच गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर (Anmol Sagar ) यांनी मंगळवारी सर्व महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पहाणी करून बैठक घेतली. यावेळी सागर यांनी ठेकेदारांना खड्डे भरण्याचे निर्देश दिले तर, यावेळी भिवंडी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी ठेकेदारांना इशारा दिला.

भिवंडी शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून यावरून पालिका प्रशासनावर टिका होत आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे देखील पूर्ण झालेली नाहीत. त्यातच गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे आगमन खड्ड्यामधून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच खड्डे आणि अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

आयुक्तांनी घेतली बैठक

गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी मंगळवारी सर्व महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पहाणी केली होती. तसेच, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी देखील गणेश विसर्जन मार्गाचा आढावा घेतला होता. या पाहाणीनंतर आयुक्त सागर यांनी एक बैठक घेतली. या बैठकीस भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, पोलीस सहायक आयुक्त सचिन सांगळे, शहर अभियंता जमील पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिते. एमएमआरडीएचे (MMRDA) अभियंता तसेच, रस्त्याचे कंत्राटदार उपस्थित होते.

ठेकेदारांना दिला इशारा

गणेशोत्सव सण अत्यंत जवळ आला असूनही, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याची कामे अपुर्ण आहेत. यावर आयुक्त सागर आणि पोलीस उपायुक्त यांनी अत्यंत नाराजी व्यक्त केली. तसेच, आयुक्त सागर यांनी सर्व कंत्राटदारांना पुढील १५ दिवसात गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, जर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात अथवा दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कंत्राटदार आणि संबंधित अभियंता यांची राहील, असा इशारा पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिला. यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.