Thane Rain update : ठाणे – ठाणे शहरासह भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भिवंडी शहरातील रस्ते जलमय झाले असून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज, मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, आज पहाटे पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सतर्क राहावे आणि गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासूनच ठाण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ ऑगस्ट रोजी दिवसभर ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात मंगळवारी देखील पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
ठाणे – ठाणे शहरासह भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भिवंडी शहरातील रस्ते जलमय झाले असून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. माणकोली पुलाखाली पाणी साचले आहे. अंजुर चौक परिसरातील होली मेरी शाळेजवळील रस्त्याला नदीचे… pic.twitter.com/3KNGzKL5FH
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2025
ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. यापावसामुळे ठाणे, डोंबिवलीतील रस्त्यांसह भिवंडीतील रस्ते देखील जलमय झाले असून गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. तर, भिवंडीत अंजुर चौक परिसरातील होली मेरी शाळेजवळील रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या पाण्यात अनेक वाहने अडकली आहेत. तर, माणकोली पुलाखाली देखील मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.