ठाणे : भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाजवळून वाहणाऱ्या कामवारी नदीत बुडून दोघा भावांचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघा भावांचे मृतदेह शनिवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने नदीतून बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले. नदी पात्राजवळ चिंबोरी पकडताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेमुळे गोरसई गावात शोककळ पसरली आहे.
सागर धुमाळ (३३) आणि अक्षय धुमाळ (२८) अशी नदीत बुडून मृत पावलेल्या दोघा भावांची नावे आहेत. हे दोघेजण भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाचे रहिवाशी होते. ते आई-वडीलांसोबत गोरसई गावात राहत होते. यातील सागरचे वर्षभरापुर्वीच लग्न झाले होते. गोरसई गावाजवळून कामवारी नदी वाहते. सागर, अक्षय हे दोघे भाऊ आणि त्यांचे काही मित्र शुक्रवारी दुपारी गावातील कामवारी नदी पात्राजवळ चिंबोरी पकडण्यासाठी गेले होते.
नदी पात्रात चिंबोरी पकडत असताना सागरचा तोल जाऊन तो नदीत पडला. सागरला पोहता येत नव्हते. तर, त्याचा भाऊ अक्षयला मात्र पोहता येत होते. सागर हा नदीत बुडत असल्याचे दिसताच, अक्षयने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, नदी पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तोही बुडला, अशी माहिती भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हषवर्धन बर्वे यांनी दिली.
सागर आणि अक्षय या दोघांसोबत आलेल्या मित्रांनी गावात जाऊन त्यांच्या कुटूंबियांसह इतरांना या घटनेची माहिती दिली. यानंतर गावातील मंडळींनी नदी पात्राजवळ धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन नदीत दोघांचा शोध सुरू केला. मात्र, अंधार झाल्याने दोघांचा शोध घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकला पाचरण करण्यात आले. या पथकाने नदीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढून ते पालकांच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलिस निरिक्षक बर्वे यांनी दिली.
गावात शोककळा
सागर धुमाळ (३३) आणि अक्षय धुमाळ (२८) हे दोघे सख्खे भाऊ होते. नदीत बुडून दोघांचा मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटूंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेमुळे गोरसई गावात शोककळा पसरली आहे.