‘बर्डस् ऑफ ठाणे-रायगड’ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (वेस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ जानेवारीला डोंबिवलीत ‘बर्ड रेस’ आयोजित करण्यात आली आहे. नागरीकरणाने निसर्गाची पुरती वाताहात झालेली असली तरी डोंबिवलीत अजूनही तब्बल २५०हून अधिक स्थलांतरित पक्षी येतात. या पाहुण्यांना हुडकून त्यांचे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमी या बर्डरेस निमित्ताने एकत्र येतात. एकमेकांच्या निरीक्षणांचे, अनुभवांचे आदानप्रदान करतात. एका अर्थाने पक्षीमित्रांचे ते एक संमेलनच असते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबर-जानेवारी उजाडला की लोकांना नवीन वर्ष/ उत्तरायण/ पतंग/ तिळगूळ यांचे वेध लागतात. पण पक्षी निरीक्षकांना मात्र स्थलांतरित पक्ष्यांचे वेध लागतात. मग त्या पाठोपाठ साजरे होणारे पक्षी महोत्सव भुरळ घालत राहतात. आताशा मुंबई परिसरात बर्ड रेस नावाचा प्रकार बऱ्यापकी रुजला आहे. दिवसभरात आपल्या परिसरातले वेगवेगळे पक्षी बघत िहडणे, त्यांची नोंद करणे. ज्याच्या अचूक आणि अधिक नोंदी असतील त्याला विजेता ठरवणे याला बर्ड रेस म्हणतात. लोकांचे अनेक गरसमज असतात. पक्ष्यांची आपापसातली स्पर्धा म्हणजे बर्ड रेस नव्हे. या निमित्ताने परिसरात कुठले पक्षी आढळतात याची नोंद होते. पर्यावरणाचा कल काय आहे? कुठल्या दिशेने आपण विकासाचा मंत्र जपतो आहोत, विकासाकडे लक्ष देताना पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतोय या गोष्टी पक्षी निरीक्षकांच्या माध्यमातून सर्वासमोर येतात.
अमेरिकेत ‘बिग इयर’ नावाचा प्रकार खूपच रुजला आहे. नुकताच भारत भेटीवर आलेला नोहा वर्षभरात सहा हजारांहून अधिक पक्ष्यांच्या नोंदी घेऊन सध्या भारत फिरतो आहे. तब्बल २४ देश त्याने निव्वळ पक्षी बघण्यासाठी पालथे घातले आहेत. याच नावाचा एक इंग्रजी चित्रपट बघायला मिळाला होता. खरे तर शाळा-शाळांमधून ‘श्वास’सारखे चित्रपट जर आपले सरकार दाखवू शकते, तर त्याच्या जोडीला ‘बिग इयर’सारखा चित्रपटही आवर्जून दाखवायला हवा. मुलांना निसर्गाची, पक्षी निरीक्षणाची आवड लागावी या उद्देशाने असे उपक्रम राबवायला हवेत.
पक्षी निरीक्षणासाठी मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या सोबतची शांतता. सर्वात लाजाळू पाखरे असतात. तुम्ही जंगलातून, पाणवठय़ावर पक्ष्यांच्या शोधात हिंडत असता. तुम्हाला वाटते तुम्ही खूपच सावध आहात पण त्याच वेळी तुम्हाला मात्र सारे पक्षी जगत सावधपणे जोखत असते. पाहात असते हे तुम्हाला समजतच नाही. अशाच एका पक्षी निरीक्षणादरम्यान रिलायन्सचा सेझ प्रकल्प अंगावर आला होता. उरणच्या खाडीकिनारी आदल्या आठवडय़ात खूप पक्षी दिसणारे खाजण एका आठवडय़ात नजर जाईल तिथवर माती पडून सपाट झालेले बघून डोळ्यात पाणी आले होते. आपल्या भारतीय संस्कृतीत स्वत:ची उन्नती करून घेण्याचे अनेक मार्ग सुचवलेले आहेत. अंतिम शोध शांततेचा असावा ही साधारण अपेक्षा असते. इथवर पोचण्याचा मार्ग पक्षी निरीक्षणापासून सुरू होऊन निसर्गातली अद्भुत शांतता झाडापानांत रमल्यामुळे मिळू शकते. रंगीबेरंगी पाखरांना शोधण्यात, बघण्यात एक वेगळीच गंमत आहे.
असो, तर यावर्षी ‘बर्डस् ऑफ ठाणे-रायगड’ ही संस्था रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्या सौजन्याने डोंबिवली बर्ड रेस २४ जानेवारीला आयोजित करत आहे. डोंबिवलीत प्रदूषण खूप आहे. अनधिकृत बांधलेल्या चाळींनी पक्ष्यांच्या हक्काच्या जागा हिरावल्यात किंवा आक्रसल्यात. तरीही भोवताली असणारी खाडी अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रय स्थान आहे. पक्षी बघायला फार दूर जाण्याची गरज नसते. आपल्या परिसरातल्या चिमण्या, कावळे, कबुतरांपासून सुरुवात करायला हरकत नाही.
डोंबिवलीत तब्बल २५०हून अधिक स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची नोंद आहे. यात मुख्यत: सी गल्स, टर्न्‍स, गॉडविटस, गरुड असे स्थलांतरित तसेच थिक-नी, इंडियन गोल्डन ओरिओल, मुनिया, किंग फिशर अशा स्थानिक पक्ष्यांची रेलचेल आढळते. नावातच वेगळेपण जपणारी ही स्पर्धा सर्वार्थाने वेगळी आहे. यातून मुरलेल्या पक्षी निरीक्षकांना आनंद तर मिळेलच त्याचबरोबर नवख्या पक्षी निरीक्षकांसाठीही हा आल्हाददायक अनुभव असेल. वाढते शहरीकरण व त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास पाहून कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवतात..
दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
असला छंद- बरा नाही.
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पाखरं उडतात माझ्याचसाठी
असला समज- खरा नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird race organized in dombivali as on sunday 24 january
First published on: 13-01-2016 at 00:21 IST