डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील सर्वाधिक वर्दळीचा आणि बाजारपेठेचा भाग असलेल्या घनश्याम गुप्ते या खराब झालेल्या, खड्डे पडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, सुस्थितीकरण येत्या आठवडाभरात केले नाहीतर दिवाळीच्या दिवशी, म्हणजे १८ ऑक्टोबर रोजी आम्ही नागरिकांच्या पुढाकाराने विष्णुनगर मासळी बाजार येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असा इशारा भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक आणि माजी नगरसेवक शैलैश धात्रक यांनी कल्याण डोंबिवली पालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांना दिला आहे.

पालिकेत शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. भाजप नेते, लोकप्रतिनिधींचा पालिका प्रशासनवर वचक आहे. अशाही परिस्थितीत भाजप नगरेसवकांना खड्डे पडलेल्या घनश्याम गुप्ते रस्त्यासाठी उपोषण करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल जात आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील घनश्याम गुप्ते रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाचे हे प्रवेशद्वार आहे. शहराच्या विविध भागातील नागरिक पायी, रिक्षा, खासगी वाहनाने या रस्त्यावरून जातो. गुप्ते रस्ता हा बाजारपेठेचा भाग आहे. गेल्या दोन वर्षापासून घनश्याम गुप्ते रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता प्राधान्याने सीमेंट काँक्रिटीकरणाचा करणे आवश्यक असताना शहरांतर्गत गल्लीबोळातील रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. या रस्त्याला उपेक्षितेची वागणूक दिली जात आहे. हे या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे, असे भाजप माजी नगरसेवक शैलैश धात्रक यांनी सांगितले.

मागील पाच महिन्याच्या काळात मुसळधार पावसाने या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहने संथगतीने धावतात. सकाळ, संध्याकाळ या रस्त्यावर वाहन कोंडी असते. गुप्ते रस्ता खराब झाला आहे हे माहिती असुनही या रस्त्यावरील खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीकरण केले जात नसल्याने पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही दिवाळी सणात लाक्षणिक उपोषणाला बसणार आहोत, असे माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी सांगितले.

रेल्वे स्थानक ते घनश्याम गुप्ते चौक दरम्यान हा रस्ता सुस्थितीत होणे आवश्यक आहे. हा रस्ता काँक्रीटचा होणार आहे असा विचार करून प्रशासन या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नाही. पालिकेने काही रस्ते एमएमआरडीएकडे काँक्रिटीकरण कामासाठी हस्तांतरित केले आहेत.

डोंबिवली शहरातील खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेतील खड्डे पडलेल्या बहुतांशी रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे पूर्ण केली आहेत. काही कामे सुरू आहे. दिवाळीपूर्वी खड्डे पडलेले, खराब झालेले रस्ते सुस्थितीत करण्यात येतील. गुप्ते रस्ता सुस्थिती केला जाईल, असे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील इतर रस्त्यांप्रमाणे घनश्याम गुप्ते रस्ता हा सर्वाधिक वर्दळ, बाजारपेठेचा रस्ता आहे. या रस्त्यांवर खड्डे पडल्यानेे पादचारी, वाहन चालक हैराण आहेत. नागरिक त्रस्त असताना पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी केली जात नाही म्हणून आम्ही दिवाळीत प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत. मनीषा धात्रक- माजी नगरसेविका, भाजप.