ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात कोणाचा उमेदवार असेल, यावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून दावे केले जात असतानाच, ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने येत्या रविवारी राज्यातील तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून हा मेळावा आयोजित करण्यात आला असला तरी यानिमित्ताने मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सूरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजप च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे करतात. परंतु त्यांच्याविरोधात कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर, ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचाच लढविणार तर, भिवंडीची जागा भाजपाच लढविणार असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी केला आहे. यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये लोकसभेच्या जागेवरून वाद रंगला असतानाच, ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने येत्या रविवारी मेळावा आयोजित केला आहे.

हेही वाचा >>>श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचाच विरोध? म्हणे, “दुसरा उमेदवार सहन करणार नाही”, कल्याणमध्ये मतभेद उघड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजनांचा प्रसार प्रत्येक कुटुंबापर्यंत करण्याचा भाजपाने निर्धार केला आहे. त्यानुसार घराघरात संपर्काची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मेळावा भरविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे लोकसभेचा मेळावा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण या मंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबरच बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाजनसंपर्क अभियानाचे संयोजक व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली. या मेळाव्याचे आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गीता जैन, आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, मिरा-भाईंदरचे अध्यक्ष रवी व्यास, महाजन संपर्क अभियानचे सहसंयोजक सचिन मोरे, मिरा-भाईंदरचे भाजपा सरचिटणीस अनिल भोसले, नवी मुंबई भाजपाचे सचिन पाटील हे निमंत्रक आहेत.