कल्याण : सामाजिक भेदाभेद नष्ट करणे आणि सर्व समाज उन्नती, विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आर्थिक निकष आणि गुणवत्ता याच आधारे येणाऱ्या काळात आरक्षण देणे ही काळाची गरज आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सामान्य लोकांना विविध प्रकारे वेठीस धरण्याचे आता सुरू असलेले प्रकार अतिशय निंदनीय आहेत, असे मत मुरबाड मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी गणेशोत्सवानिमित्त दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

भारतीय संविधानाने सर्वंकश सामाजिक विकास साधण्यासाठी अधिकार आणि हक्काची चौकट निश्चित केली आहे. या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे. आता कोणीही उठतो आणि मनमानी पध्दतीने आरक्षणाची मागणी करतो. हे संविधानाच्या चौकटीला आव्हान देण्यासारखे आहे. स्वातंत्र्याची ७७ वर्ष झाली तरी आपण आरक्षणाच्याच वाटेवरून पुढे जाणार असू तर मग बौध्दिक क्षमता, गुणवत्ता, अंगभूत कौशल्ये या माध्यमातून आपण पुढे कधी जाणार, असा प्रश्न आमदार कथोरे यांनी केला.

एकीकडे आपण नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाच्या मोठ्या गप्पा मारायच्या. त्याच बरोबर उठसुठ आरक्षणासाठी आंदोलने करून रस्ते अडवायचे, लोकांना वेठीस धरायचे हे सर्व किती दिवस चालणार, असे प्रश्न आमदार कथोरे यांनी मुंबईत मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. काही विशिष्ट मागास जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना शिक्षण, नोकरीमध्ये काही काळासाठी कालबध्द आरक्षणाचे धोरण ठेवले होते. हा समाज विकसित झाल्यानंंतर ते आरक्षण रद्द होणे अपेक्षित होते. याऊलट दिवसेंंदिवस आरक्षणाची मागणी वाढत आहे. या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होत आहे. आरक्षणामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना लोप पावत आहे. आरक्षण हेच फक्त आपला विकास करू शकते, ही भावना समाज, राष्ट्र विकासाला अनंत काळासाठी मारक आहे, असे आमदार कथोरे यांनी सांगितले.

भारत एक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे. अनेक भारतीय विदेशात महत्वाच्या पदांवर काम करत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आता आरक्षण कायमस्वरुपी बंद करावे. आर्थिक निकष आणि गुणवत्तेच्या आधारे ज्यांना खरच गरज आहे त्यांनाच आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक होत आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या नवीन संधीसाठी तरूणांनी कौशल्यधारित प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे आमदार कथोरे यांनी सांगितले.

डोंबिवलीकर आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवा अय्यर गेले आहेत. त्यांनी एका मराठी माणसाने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण एक मराठी माणूस म्हणून मुंबईत आलो असल्याचे सांगितले. मागील तीन महिन्याच्या काळात प्रा. अय्यर यांनी राज्यभर महाराष्ट्रीय पंतप्रधान झालाच पाहिजे या मागणीसाठी एक अभियान राबविले.