ठाणे : राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी करण्यात येते. या बॅनरबाजीवर मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च होतात आणि शहराचे विद्रुपिकरणही होते. हे सर्व टाळण्यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावू नका, त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असे आवाहन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरभर बॅनर झळकतात. या बॅनरवर नेत्यांचा कार्यसम्राट, भाग्यविधाते, लोकनेते, दादा, भाई, असा उल्लेख करून शुभेच्छा देण्यात येतात. आपल्या नेत्याप्रति किती निष्ठा आहे, हे दाखवून देण्याचे काम कार्यकर्ते बॅनरबाजीतून करतात. शहरातील रस्ते, महामार्ग, विद्युत खांब, चौक अशा सर्वच ठिकाणी हे बॅनर लावण्यात येतात आणि त्यामुळे शहर विद्रुप होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका दिवसाकरिता बॅनरबाजीवर मोठा खर्च होता. त्या खर्चाचा सदुपयोग होत नाही. याच भावनेतून भाजप आमदार संजय केळकर हे दरवर्षी वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे होर्डिंग्ज-बॅनर नको, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असे आवाहन करत आहेत.
भाजप आमदार संजय केळकर यांचा ९ जुलै रोजी वाढदिवस असतो. वाढदिवस शुभेच्छांचे बॅनर न लावता ठाणे शहरात लोकहिताचे अनेक उपक्रम राबवून सेवा दिवस म्हणून साजरा करतात. शहरात, प्रभागात झालेल्या विकासकामाची, योजनांची, उपक्रमांची माहिती बॅनरद्वारे दिली जाते. त्यामुळेच केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुभेच्छांचे बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबवत गेली अनेक वर्षे हे पथ्य पाळत असतात. यंदाही केळकर यांनी ही प्रथा कायम ठेवली आहे. केळकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. त्यामुळे यंदाही हीच परंपरा कायम राहावी यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डींग्ज, फलक, बॅनर न लावता त्या पैशांतून गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे विनम्र आवाहन आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.