Gadkari Rangayatan : ठाणे : ठाणे महापालिकेने नुतनीकरण केलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे नुकतेच लोकार्पण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या नाट्यगृहात १९७८ आणि १९९९ साली बसविण्यात आलेल्या कोनशिलांना नुतनीकरणानंतर एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह ठाकरे गटाने संताप व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ आता या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टिका केली. यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कुरबुरी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
गडकरी रंगायतनचे नुतनीकरण झाले आणि त्याचे लोकार्पणही झाले. हे काम खूप महिने सुरू होते. याठिकाणी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी भेटी देऊन काही सुचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे मी ही काही सुचना केल्या होत्या. ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात कलाकार राहतात. या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे कलाकारांना सराव करण्यासाठी तालीम हाॅल गरजेचा आहे. शाळांमध्येही तालीम हाॅल उपलब्ध होत नाहीत. गडकरी रंगायतनमध्ये एकच तालीम हाॅल आहे. तो वाढविणे गरजेचे होते. दुसऱ्या टप्प्यात हाॅल वाढविण्यात येणार आहे. खरेतर पहिल्या टप्प्यात हे काम करायला हवे होते, असे भाजप आमदार संजय केळकर म्हणाले.
ठाणे शहरात अनेक कलाकार निर्माण झाले आहेत आणि त्यांनी मोठ विक्रम केले आहेत. शहरात, देशात तसेच परदेशात संगीत, नृत्य, नाट्य तसेच इतर कलेच्या माध्यमातून कलाकारांनी ठाण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याची चित्रफित ती दाखविण्यात आली. परंतु बऱ्याच वेळी आमची महापालिकेची मंडळी एकतर्फी असतात. आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही. पण, गेल्या ४० वर्षांमध्ये मी एकमेव आमदार आहे की, ज्याने दिडशेहून अधिक व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत. स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचे ४० दिवसांमध्ये अकरा प्रयोग, हे जगप्रसिद्ध रेकॉर्ड आहे. त्याचा आम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला. सलग ११ प्रयोग करणे सोप नाही. जेव्हा सलग ११ प्रयोग होत होते, तेव्हा रात्री दोन अडीच वाजता ठाणेकरांनी उपस्थितीत राहून दाद दिली. त्यामुळे ठाणेकरांचाा मला अभिमान वाटतो, असे केळकर म्हणाले.
एक रिमोट कंट्रोल
आमचे इथे एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढे सांगतील त्याप्रमाणेच आयोजन केले जाते आणि त्यामुळे त्या चित्रफितीबद्दल नवीन काही नाही. मी माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही. परंतु चाळीस वर्षात इतके आमदार झाले. पण, या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला. त्याने रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला. परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असत की, महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन कोणाच्या तरी आधीन गेलेले दिसत आहे. मला अनेक लोकांचे फोन आले. नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी मला या संबंधांमध्ये विचारले, मी सांगितले की, हे काही आजच नसून हे नेहमीचच आहे. आता हे बदलण्याचे काम तुमचे आहे, असे ते म्हणाले. कुठली चित्रफित असो ठाण्याचे प्रतिनिधित्व किंवा विकासाचे काम दाखवणे गरजेचे होते. परंतु ही नेहमीचीच सवय झाली आहे आणि ठाणेकरांना बरोबर माहिती आहे, ते यावर योग्य वेळेला योग्य उत्तर देतील, अशी टिकाही त्यांनी केली.
कोनशीलाबबात नाराजी
बाळासाहेब ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि तो तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांनी तो उचलून धरत पुर्णत्वास नेला. त्यांचे मी कौतुक करेन. कारण, गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह ही ठाण्याची शान आहे. ते उभे राहण्यामागे सतीश प्रधान यांचे मोठे योगदान आहे. बाळासाहेब असो किंवा धर्मवीर आनंद दिघे असो, त्यांची जी पूर्वी कोनशीला होती, ती त्यांचं योग्य पद्धतीनेच लावणे गरजेचे होते. ती अडगळीत टाकणे योग्य नाही, असे केळकर म्हणाले.