राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. यापुढील काळातही ठाण्याच्या विविध भागात आंदोलने करण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नितेश राणेंकडून अजित पवारांचा ‘धरणवीर’ म्हणून उल्लेख; संभाजी महाराजांवरील विधानानंतर म्हणाले; “थोडीजरी लाज…”

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अजित पवार यांचा तीव्र निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी नरकयातना भोगूनही धर्मांतर केले नव्हते. त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले होते. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य निंदनीय आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. तर `दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ असा टोला लगावत आमदार संजय केळकर यांनी अजित पवारांचा तीव्र निषेध केला. या आंदोलनात भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, शहर सरचिटणीस कैलास म्हात्रे, मनोहर सुगदरे, महिला मोर्चाच्या मृणाल पेंडसे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp protests against ajit pawar s comment against chhatrapati sambhaji maharaj zws
First published on: 02-01-2023 at 19:15 IST