ठाणेः ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन नेत्यांमधील दुराव्यावर आता थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच शालजोडीत भाष्य केल्याची बाब समोर आली आहे. नुकतात मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्याने भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना स्थानिक आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यातील दुरावलेल्या संबंधांवर अप्रत्यक्ष भाष्य केले. नव्याने पक्षात दाखल झालेले सुभाष पवार हे या दोन नेत्यांना जोडण्यासाठीचा दुवा ठरतील, अशी आशाही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर तरी हे दोन नेते एकत्र येतील का याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्ह्यात भाजपचा विस्तार झपाट्याने होतो आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढते आहे. एकेकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असलेले बहुतांश भाग भाजपच्या अधिपत्याखाली येत आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि दशकभरापूर्वी भाजपात आलेल्या दोन नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ही बाब आढळली आणि खटकली सुद्धा आहे. त्यांच्यात मनोमीलनाचे प्रयत्नही झाले आहेत. मात्र त्यानंतरही दोघांमधील दुरावा ही वेळोवेळी चर्चेचा बाब ठरते आहे.
मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात गुरूवारी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपात आलेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा प्रवेश पार पडला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मात्र दोघांमधील दुरावा अनेक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांना दिसत होता. दोन्ही नेत्यांनी मंचावर एकदाही एकमेकांकडे पाहिले नाही. एकमेकांशी एकदाही संवाद साधला नाही. औपचारिकता म्हणून दोन्ही नेत्यांनी भाषणात एकमेकांचे नाव आवर्जून घेतले. तर पाटील यांनी कथोरेंचा दोनदा उल्लेख केला. मात्र त्या पलिकडे एकही शब्दाचा संवाद दोहोंमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हा दुरावा हेरला. त्यांनी आपल्या भाषणात या दोघांच्या संबंधांवर अप्रत्यक्ष भाष्य केले.
रविंद्र चव्हाण यांनी सुभाष पवार यांचे भाजपात स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळ बोलाना सुभाष पवार हे कपिल पाटील आणि किसन कथोरे यांना जोडण्यासाठीचा दुवा ठरतील, असे वक्तव्य केले. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. हे माझे नाही तर हे सर्व कार्यकर्त्यांचे मत आहे असेही चव्हाण पुढे म्हणाले. कपिल पाटील यांनी चव्हाणांना उद्देशून हे आपल्यातील दुवा ठरतील, अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिला. मात्र रविंंद्र चव्हाणांनी तात्काळ या दोघांवर स्तुतीसुमणे उधळली. ते दोघे एकत्र राहून एकत्रित काम करू शकतील, अशी आशाही चव्हाण यांनी व्यक्त केली. कथोरे, पाटील हे ताकदीचे नेते आहेत. त्यांनीच पवार हे नेतृत्व दिले, असेही चव्हाण पुढे म्हणाले. सुभाष पवार यांच्या प्रवेशाने कथोरे आणि पाटील यांच्यातील संबंध सुधारतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकत्र काम करणार – कथोरे
दरम्यान यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे यांनी भविष्यात एकत्र काम करणार असल्याचे सांगितले. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद सर्वांवर भाजप हवी. त्यासाठी एकत्रितपणे काम करणार. आम्ही सगळे शांताराम घोलप आणि गोटीराम पवार यांच्या हाताखाली घडलो, त्यांना विसरता येणार नाही, असेही कथोरे यावेळी म्हणाले.
आम्ही चार इंजिन – पाटील
कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना हा पक्षप्रवेश ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असल्याचे म्हटले. आठ जिल्हा परिषदेच्या जागा एकतर्फी जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आता मुरबाडमध्ये चार इंजिन झाले आहेत. मंत्री गणेश नाईक, किसन कथोरे, कपिल पाटील आणि आता सुभाष पवार. या चाहरी इंजीनांना बांधण्याचे काम रविंद्र चव्हाणांनी केले. आता मध्ये येणारे सर्व इंजिन बाजूला करायचे आहेत, असेही पाटील म्हणाले. आम्ही एकत्र काम केले तर मुरबाड सोडून शहापुरातही कार्यकर्ते, पदाधिकारी पाठवता येतील, असेही पाटील बोलताना म्हणाले.
