मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही भाजपची टिका

ठाणे : दिवा शहराचे सिंगापूर करू अशी घोषणा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिव्यातील एका कार्यक्रमात केली होती. या कार्यक्रमानंतर भाजपने नरेश म्हस्के यांच्यावर दिव्यातील असुविधांचे चित्रीकरण समाजमाध्यमावर पाठवून टिका करण्यास सुरूवात केली आहे. दिवा येथील भाजपचे शहराध्यक्ष रोहीदास मुंडे यांच्यावर आरोप करत नरेश म्हस्के यांना “डोके ठिकाणावर आहे का”? असा सवाल केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही समूह विकास योजनेच्या मुद्द्यावरून आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. दिव्यातही भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीयावर आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर थेट आरोप केले जात असल्याने भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष जनतेसमोर येऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मलंगगड जवळील करवले येथील भरावभूमीस शेतकऱ्यांचा विरोध, ; योग्य भरपाई देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

दिवा शहराचा विकास झपाट्याने होत आहे. दिव्याला सिंगापूर बनवायचयं अशी घोषणा नरेश म्हस्के यांनी एका कार्यक्रमात केली होती. पाणी, वीज यांसारख्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही म्हस्के म्हणाले होते. म्हस्के यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना रडारवर घेण्यास सुरूवात केली आहे.

नरेश म्हस्के यांची ही वक्तव्य फेसबुक या समाजमाध्यमावर प्रसारित केली जात आहे. तसेच दिव्यातील असुविधेचेही चित्रीकरण या वक्तव्यासोबत जोडली जात आहे. दिवा येथील भाजपचे शहराध्यक्ष रोहीदास मुंडे यांनी थेट नरेश म्हस्के यांना त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? अशी टिका केली आहे. आमच्या दिव्याचे सिंगापूर नका करू, आमच्या दिव्याचे “ठाणे” करा हीच आमची मागणी आहे. दिव्यातील जनतेला खोटी आश्वासन देणे बंद करा. असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> मालमत्ता कर, पाणी देयकाची ग्राहकांना पूर्वसूचना देणारी आज्ञावली विकसित करा, अतिरिक्त आयुक्तांचे ‘एबीएम नॉलेजवेअर’ला आदेश

खासदार श्रीकांत शिंदेवरही टिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही त्यांनी आरोप केला आहे. समूह विकास योजना (क्लस्टर) दिव्यात राबविणार असल्याचे गाजर खासदारांनी दाखविले आहे. परंतु आपण ज्या किसननगर मध्ये राहत होतात. तिथे १५ वर्षांपासून क्लस्टर येणार सांगत होते. परंतु क्लस्टरची एक विटही ठाण्यात रचली नाही. अद्याप ठाण्यात क्लस्टर आले नाही तर दिव्यात एवढ्या लवकर क्लस्टर कसा येणार असा सवाल मुंडे यांनी केला. दिव्यात अनधिकृत इमारती उभारत आहेत. प्रत्येक स्लॅब मागे तुमचे “चमचे”३ लाख रुपये जमा करत आहेत. याची माहिती घ्या असेही ते म्हणाले. ठाण्यातल्या नेत्यांनी दिव्यात येणे बंद करा. कारण त्यांनी दिव्यातले लुटायचे कान केले आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे.

शिंदे आणि भाजपतील संघर्ष तीव्र

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिव्यातही भाजपकडून शिंदे गटावर थेट आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिंदे आणि भाजपतील संघर्ष तीव्र होत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp target shinde group spokesperson naresh mhaske over statement of making diva to singapore zws
First published on: 03-01-2023 at 20:21 IST