कल्याण : कल्याण पश्चिमेतील शहाड येथे रेल्वे स्थानकाजवळ नवरात्रोत्सवाचा शुभेच्छा फलक लावण्यावरून भाजपचे शहाड येथील प्रमुख मोहन कोनकर आणि शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक मुकेश गणेश कोट यांच्यात जोरदार राडा झाला. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण केल्याने दोन्ही गटाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

या मारहाण प्रकरणामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा फलक लावण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण डोंबिवली शहरांमधील अनेक रस्त्यांवरील, रेल्वे स्थानक भागातील मोक्याच्या जागा काही स्थानिक राजकीय मंडळी, नगरसेवक यांनी बेकायदा कब्जा करून ठेवल्या आहेत. या जागांंवर ते पालिकेच्या परवानग्या न घेता नियमित या जागेत शुभेच्छा फलक लावत असतात. पालिका कर्मचारी ते फलक काढण्यासाठी गेले की वजनदार नेत्याचा फोन आणून हे स्थानिक कार्यकर्ते पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी करून फलकाला हात लावून न देता परत पाठवितात.

बुधवारी शहाड भागातील शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक मुकेश गणेश कोट यांचा मुलगा आपल्या कार्यकर्त्यांसह शहाड रेल्वे स्थानकाजवळ नवरात्रोत्सवाचा शुभेच्छा फलक लावण्यासाठी गेले होता. तेथे एक फलक लावण्यासाठी लाकडी चौकट होती. तेथे उपस्थित असलेल्या शहाड भाजपचे विभाग अध्यक्ष मोहन कोनकर यांनी मुकेश कोट यांच्या मुलाला फलक लावण्यास विरोध केला. ही आपण लावलेली लाकडी चौकट आहे. याठिकाणी तुम्ही फलक लावू नका, असे भाजपचे कोनकर यांनी मुकेश कोट यांच्या मुलाला सांगितले.

मुकेश यांच्या मुलाने वडिलांना घटनास्थळी बोलून घेतले. त्यावेळी भाजपचे मोहन कोनकर यांनी आपल्या फलकावर फलक लावण्यास कोट यांना विरोध केला. या विरोधातून मुकेश आणि मोहन कोनकर यांच्यासह समर्थकांमध्ये जोरदार राडा होऊन एकमेकांना जखमा होईपर्यंत दोघांनी मारहाण केली. आपण अनेक वर्ष शहाड रेल्वे स्थानकाजवळील लाकडी चौकटीवर फलक लावतो. त्याठिकाणी कोणीही फलक लावत नाही. यापूर्वी तेथे आपला फलक फाडून या लोकांनी फलक लावला होता, असे कोनकर यांनी सांंगितले. या मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे कल्याण, डोंबिवली शहरांचे बेकायदा फलकांमुळे विद्रुपीकरण झाले आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अंतर्गत बेकायदा फलक विषय असतो. या विभागाचे कर्मचारी दालन सोडून बाहेर पडत नाहीत. स्थानिक प्रभाग स्तरावरील अधिकारी राजकीय मंडळींचे शब्द ऐकून बेकायदा फलक काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना राजकीय मंडळींच्या रोषाला सामोरे जावे लागते.

शहरात बेकायदा फलकांच्या माध्यमातून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पालिका प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. सनदी सेवेतील कर्तव्य कठोर आयुक्त लाभूनही शहराची ही अवस्था झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त, मालमत्ता उपायुक्तांनी दालना बाहेर पडून शहरभर लागलेले बेकायदा फलक एकदा नजरे खालून घालावेत आणि त्यांच्यावर विद्रुपीकरण कायद्याने गु्न्हे दाखल करण्याचे आदेश प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्याची मागणी नागरिक करत आहेत.