डोंबिवली पश्चिमेत बेकायदा चाळी उभारणाऱ्या भूमाफियांना पालिका प्रशासनाने धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. रेतीबंदर खाडीकिनाऱ्यावरील ६० ते ७० चाळी जमीनदोस्त केल्यानंतर ‘ह’ प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रनगर भागातील २० खोल्या व १३ जोती ‘जेसीबी’च्या साह्य़ाने भुईसपाट केली.
महाराष्ट्रनगरमध्ये नव्याने बेकायदा चाळी उभारण्यात येत असल्याची माहिती ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना मिळाली होती. बांधकामांच्या ठिकाणी पहिली पाहणी करण्यात आली. या चाळी बेकायदेशीर बांधण्यात येत असल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, त्यांचे पोलीस कर्मचारी, पालिकेचे उपअभियंता योगेंद्र राठोड, गजानन स्वामी यांच्या पथकाने ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.
पालिका अधिकाऱ्यांचे समाधान आम्ही करू शकलो नाही म्हणून त्यांनी आमची बांधकामे तोडली, असा आरोप येथील बांधकामे करणाऱ्या मालकांकडून करण्यात येत होता. पण पालिका अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांचा सव्‍‌र्हे करून ही बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे आकसाने कारवाई केली असे कोणी म्हणू शकत नाही, असे कुमावत यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली पश्चिमेत उभी राहणाऱ्या नव्या बांधकामांचे सर्वेक्षण चालू आहे. काही चाळींची बांधकामे निकृष्ट साहित्य वापरून उभारण्यात येत आहेत. या खोल्यांमध्ये राहण्यास येत असलेल्या रहिवाशांचा जीविताचा विचार करून बेकायदा चाळींची बांधकामे तोडण्याची मोहीम ‘ह’ प्रभागातर्फे सुरूच ठेवण्यात येणार आहे.
– परशुराम कुमावत
‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी