ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू होती. खुद्द अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना फेटाळून लावले. त्यानंतर भाजपा कार्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय नेते शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यानिमित्त पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मराठवाड्यातील एक प्रमुख नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश होणार होता? याबद्दल फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मराठवाड्यातील नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राहिल प्रश्न अंबादास दानवेंचा तर आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो, तेव्हा माध्यमांना कळतच नाही आणि जेव्हा माध्यमांना कळलेलं असतं तेव्हा ऑपरेशन होत नाही.” पुढे माहिती देताना फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही.
अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत, माध्यमांनी त्यांच्या नावाची चर्चा करून त्यांना अडचणीत आणू नये, असाही मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
काही मतदारसंघामुळे जागावाटप रखडले
महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्णपणे जाहीर झालेले नाही. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काही जागांवर महायुतीमध्ये नक्कीच वाद आहते, हे मान्य केले. एखाद दुसऱ्या जागेमुळे इतर काही जागांचा निर्णय जाहीर करता येत नाही, याची कबुलीच त्यांनी दिली. मात्र आम्ही समन्वयातून इतरही जागांचा निर्णय लगेच जाहीर करू, असेही त्यांनी आज म्हटले.
अमित देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार?
काँग्रसचे नेते अमित देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याबाबतचाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना यावेळी विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, अमित देशमुख कुठूनही माझ्या संपर्कात नाहीत. त्यांचा भाजपामध्ये प्रवेश घेण्याची कोणतीही चर्चा नाही. जरी आमचे विरोधक असले तरी त्यांना संशयाच्या फेऱ्यात आणण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली
मनसेबरोबर आमच्या बैठका झाल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना सर्वप्रकारच्या शक्यता पडताळल्या जातात. पण मनसेबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.