कल्याण : मुंबई-अहमदाबाद या ५०८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गिकेतील भुयारी, उन्नत कामे प्रगतीपथावर आहेत. आता या कामाच्या नियंत्रक मुंबई हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने बुलेट ट्रेन मार्गिकेचे दिवा-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान खाडी भागातील मार्गिकेचे काम सुरू केले आहे. अवजड अत्याधुनिक यंत्रे आणि त्यावरील मनुष्यबळ याठिकाणी दिवस रात्र ही कामे पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानके सोडली की लोकलमधून प्रवाशांना दिवा कोपर खाडी दरम्यान खारफुटीच्या जंगलाने वेढलेल्या खाडीत, दलदलीच्या जागेत अजस्त्र यंत्रांच्या साहाय्याने काही कामे सुरू असल्याचे दिसत होते. उत्तर दक्षिण दिशेन सुरू असलेले हे खाडी भागातील काम बुलेट ट्रेन मार्गिकेचे असल्याचे रेल्वेच्या सुत्राने सांगितले. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-कोपर-मुंब्रा रेल्वे मार्गाला छेदून बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबईत बांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथून या ट्रेनचा मार्ग सुरू होत आहे. ही ट्रेन ठाणे खाडी भागात भुयारी मार्गाने त्यानंतर नवी मुंबईतील घणसोली, शिळफाटा, दिवा गावाजवळील म्हातार्डेश्वर मंदिर परिसरातून खाडी मार्गाने वसई, डहाणू, वापी ते साबरमती, अहमदाबाद अशी धावणार आहे.
दिवा कोपर खाडी भागात घनदाट खारफुटीचे जंगल आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करताना, रेल्वे मार्गिकेतून जाणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत दलदलीच्या खाडी भागात अजस्त्र यंत्रांची फक्त टोके दूरवरून दिसत होती. या अजस्त्र यंत्रांविषयी नागरिकांच्या मनात संभ्रम होता. आता बुलेट ट्रेनसाठी दिवा, कोपर खाडी भागात सुरू असलेले काम दृष्टीपथात दिसू लागले आहे.
दिवा गावा जवळील म्हातार्डेश्वर भागात बुलेट ट्रेनची कार शेड असणार आहे. नवी मुंबईतील घणसोली ते शिळफाटा दरम्यानच्या ४.८ किलोमीटरच्या मार्गिकेतील चार किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. बुलेट ट्रेनचा मुंबई बीकेसी ते ठाणे दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू आहे. यामधील सात किलोमीटरचा मार्ग निव्वळ समुद्राखालून असणार आहे. ठाणे खाडीखालून बुलेट ट्रेनची मार्गिका आहे. या बोगद्याचे काम सुरू झाले आहे. या भागातील बोगद्याचे काम करण्यापूर्वी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने ठाणे खाडी परिसरातील चिखलमय, दलदल परिसरावर बुलेट ट्रेन मार्गिकेचा काही परिणाम होईल का याचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार केला. या अहवालाप्रमाणे जमिनीच्या पातळीपासून वीस मीटर खोलवरून धावणाऱ्या वेगवान बुलेट ट्रेनचा भुपृष्ठावर किंवा भुपृष्ठाखालील बोगद्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे या भागातील भूस्तराचा विचार करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही कामे केली जात आहेत, असे रेल्वेच्या एका विश्वसनीय सुत्राने सांगितले.
जपानमधील शिंकान्सन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जपानच्या साहाय्याने या रेल्वे प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. बुलेट ट्रेन नागरी वस्ती, डोंगराळ प्रदेश, खाडी किनारा भागातून धावणार आहे. अतिवेगाने ही रेल्वे धावणार असल्याने ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी या रेल्वे मार्गावर ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहेत, असे रेल्वेच्या सुत्राने सांगितले.