अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच धावाधाव पाहायला मिळाली. अंतिम क्षणाला मिळालेला एबी अर्ज, कार्यकर्त्यांची जमवाजमव, वेळेत अर्ज दाखल होण्याची धाकधूक अशी सर्व परिस्थिती सोमवारी अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेबाहेर पाहायाला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेत अक्षरशः रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पालिकेत मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

जवळपास साडे दहा वर्षांनंतर होत असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दोन्ही शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मोठी धावपळ पहायला मिळाली. जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळपासून उमेदवारांची पक्षाचा एबी अर्ज घेण्यासाठी धावपळ पाहायला मिळाली. शिवसेनेच्या उमेदवारांना एकीकडे अर्ज दिले जात होते तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर यांची मिरवणूक सुरू होती. त्यामुळे काही उमेदवारांनी थेट पालिका मुख्यालयात धाव घेत अर्ज भरण्यासाठी रांग लावली होती.

पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर उमेदवारांचे समर्थक, सूचक उमेदवारांसह अर्ज घेऊन रांगेत उभे होते. अनेक जणांनी कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांचाही प्रति अर्ज दाखल केला. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मोठी रांग पाहायला मिळाली. पालिका मुख्यालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पालिकेत गर्दी झाली होती. इमारतीच्या खाली प्रवेशद्वारावर, तर पालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेतही सकाळपासूनच सर्व पक्षाचे उमेदवारांची धावाधाव पाहायला मिळाली. कुठे आपल्याच प्रभागात पक्षाने दुसरा उमेदवार दिल्याने जुन्या उमेदवाराची दुसऱ्या पक्षाच्या एबी अर्ज मिळवण्यासाठी धावाधाव तर कुठे सहकारी पक्षांना वेळेत पोहोचवण्यासाठीची कार्यकर्त्यांची धावाधावही यावेळी पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला शिवसेना कार्यकर्त्यांच्या गराड्यातून पालिका मुख्यालयात प्रवेश करताना अर्धा ते पाऊण तास वाट पाहावी लागली. त्यामुळे त्या उमेदवाराने संताप व्यक्त केला.

शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही शहरात शिवसेनेने मोठे शक्तीप्रदर्श केले. अंबरनाथमध्ये मनिषा वाळेकर तर बदलापुरात वीणा म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रकाश पाटील उपस्थित होते. या दरम्यान शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.

खासदारांचीही धावाधाव

तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ असल्याने उमेदवारांनी जय्यत तयारी केली. मात्र शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्याचा असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अंबरनाथमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर तेथून बदलापुरला जाण्यासाठी श्रीकांत शिंदे यांना वेळ लागला. मात्र वेळ संपण्याच्या पाच मिनिट आधी शिंदे पालिका मुख्यालयात पोहोचले. तेथून त्यांनी धावतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.

माजी भाजप नगरसेवक शिवसेनेत

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिट आधी भाजपने आपल्याच प्रभागात दुसऱ्या उमेदावारालाही एबी फॉर्म दिल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी शहरप्रमुख संजय भोईर यांनी आयत्या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाची शहरभर चर्चा सुरू होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका मुख्यालयातच त्यांचे स्वागत केले.