कल्याण – कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एका इसमाला पोलिसांनी बंदोबस्तात हजर केले होते. या इसमाला भेटण्यासाठी त्याचा मित्र न्यायालयात आला होता. पोलीस बंदोबस्तात असलेल्या इसमाला मित्र इशारे, खाणाखुणा करून काहीतरी सूचवत होता. पोलिसांनी त्याला न्यायालय दालनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल केला आहे. मंंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान न्यायाधीश पत्रावळे यांच्या दालनाबाहेर हा सगळा प्रकार घडला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी हवालदार मच्छिंद्र माळी यांनी तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुजित उत्तम गुप्ता (१९, रा. भोसले नगर, बदलापूर) असे गुन्हा दाखल इसमाचे नाव आहे. तो मासळी विक्रेता आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीत हवालदार माळी यांनी म्हटले आहे, की कल्याण न्यायालयात मंगळवारी नागेश चंद्रकांत दांडे (२७) यांना पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. नागेश यांना भेटण्यासाठी त्यांचा बदलापूर येथे राहणारा मित्र सुजित गुप्ता न्यायालयात आला होता. नागेश दांडे यांना न्यायालयाच्या दालनाबाहेर पोलिसांनी पुकारा होताच हजर करण्यासाठी सज्जता ठेवली होती. यावेळी त्यांच्या भोवती पोलीस सुरक्षा कडे होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागेश यांच्याकडे पाहून सुजित गुप्ता हे काही तरी इशारे करत असल्याचे, त्यांच्याशी इशाऱ्याव्दारे बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस अधिकारी सोळंके यांनी हा प्रकार बघून सुजित गुप्ता याला समज देऊन तेथून जाण्यास सांगितले. त्याचा राग येऊन गुप्ता यांनी न्यायालयात पोलीस अधिकारी सोळंके, हवालदार माळी यांच्याशी हु्ज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली, अरेरावी केली. आरोपीस पळून लावण्यासाठी पोलिसांशी गुप्ता याने धक्काबुक्की करून गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत गुप्ता याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.