ठाण्यातील बँकेचे ‘ट्रान्झॉप’ मोबाइल अ‍ॅप; लवकरच भाजीविक्रेत्यांनाही सुविधा

नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेला चलनतुटवडा आणि रोकडरहित अर्थव्यवस्थेसाठी सुरू असलेले प्रयत्न या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील रिक्षाप्रवासही रोकडरहित करण्याच्या हेतूने ठाणे जनता सहकारी बँकेने(टीजेएसबी) पावले उचलली आहेत. या बँकेने विकसित केलेल्या ‘ट्रान्झॉप’ या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्षाचालकांना प्रवाशांकडून भाडय़ाची रक्कम स्वीकारता येईल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे शिवाय सुटय़ा पैशांअभावी होणारे वादही टळणार आहेत. आतापर्यंत दीडशे रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे.

कोणत्याही बँकेचा खातेदार या अ‍ॅपचा वापर करून आर्थिक व्यवहार  करू शकतो. तसेच या व्यवहारांसाठी त्याच्याकडून कोणतेही शुल्क आकरण्यात येत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. रिक्षावाल्यांपाठोपाठ पुढच्या टप्प्यात भाजी विक्रेत्यांचे आर्थिक व्यवहार ‘ट्रॉन्झ्ॉप’च्या माध्यमातून रोकडविरहित करण्यात येणार आहे. रिझव्‍‌र्ह बँक, एनपीसीआय आणि सेंट्रल रजिस्ट्रारने टीजेएसबी बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त कामकाजाला मान्यता दिली आहे. टीजेएसबी बँकेने यूपीआयच्या (युनीफाइड पेमेंट इंटरफेस) आधारे हे अ‍ॅप विकसित केल्यामुळे त्यामध्ये तब्बल तीसहून अधिक बँकांचा समावेश आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना टीजेएसबीव्यतिरिक्त अन्य बँकेच्या खात्यामधून पैसे स्वीकारणे शक्य होऊ शकते. तसेच या अ‍ॅपमध्ये आयएफसी कोड, एमएमआयडी आणि आधार कार्ड क्रमांकाद्वारेही आर्थिक व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांकडे रोकडविरहित व्यवहारासाठी अन्य पर्यायही खुले आहेत.

रिक्षाचालकांपाठोपाठ भाजी विक्रेते आणि छोटे दुकानदारांचे आर्थिक व्यवहार अ‍ॅपच्या माध्यमातून रोकडविरहित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून गावदेवी भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांसाठी शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती टीजेएसबीचे डिजिटल प्रॉडक्टचे व्यवस्थापक शैलेश चित्रे यांनी दिली.

अडीच हजार रिक्षाचालकांचे लक्ष्य

रिक्षा प्रवास भाडय़ाचे आर्थिक व्यवहार रोकडविरहित व्हावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांमध्ये बँकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत दीडशे रिक्षाचालकांनी अ‍ॅपवर नोंदणी केली असून अडीच हजार रिक्षाचालकांची अशा प्रकारे नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी दिली.

जिल्हा प्रशासनातर्फेही चालकांची कार्यशाळा

ठाण्यातील रिक्षाचालकांनी प्रवासी भाडय़ाची रक्कम स्वीकारण्यासाठी रोकडरहीत व्यवहार करावा म्हणून जिल्हा प्रशासनाने मंगळवारी नियोजनभवन येथे रोकडरहित महाराष्ट्र अभियान कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी तसेच डिजिटल मार्केटिंगचे संचालक योगी उदगीर यांनी रोकडरहीत व्यवहारासंबंधी रिक्षाचालक व मालकांना मार्गदर्शन  केले. त्याचप्रमाणे बिनाऊ  कंपनीचे विपणन प्रमुख संजय मुडने यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक उमेश गोरडे यांनी प्रत्यक्षात व्यवहार कसा करावा, याची माहिती दिली. या कार्यशाळेला रिक्षाचालक तसेच मालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन रोकडरहीत व्यवहारासाठी विविध पर्यायांचा वापर करण्याची तयारी दर्शविली. या कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी हेमांगी  पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व  रिक्षा प्रतिनिधी व रिक्षाचालक,मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.