देखभाल-दुरुस्तीअभावी अध्र्याहून अधिक कॅमेऱ्यांमध्ये दोष
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी स्थानकाबाहेर बसवण्यात आलेल्या ३५ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांपैकी अध्र्याहून अधिक कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. ठाणे शहराचे तत्कालीन आमदार राजन विचारे यांच्या निधीतून हे कॅमेरे बसविण्यात आले होते. वाहतूक शाखेच्या चौकीत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण देण्यात असले तरी नियंत्रण कक्षातील स्क्रीन बंद असल्याची माहिती पुढे येत आहे. या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करायची कोणी, या विवंचनेत ठेकेदार आणि वाहतूक शाखा असल्याने ही यंत्रणा बंद असल्याचे समजते.
ठाणे रेल्वे स्थानक परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन येथील सुरक्षाव्यवस्था चोख राहावी यासाठी सॅटिस पुलाखालील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. ठाण्याचे तत्कालीन आमदार राजन विचारे यांच्या निधीतून ३५ कॅमेरे या भागात बसवण्यात आले. तसेच याचा नियंत्रण कक्ष वाहतूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, गेल्या पाच वर्षांत या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्तीच न झाल्याने त्यामध्ये बिघाड निर्माण होऊ लागला आहे.याविषयी रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने या भागातील सीसीटीव्ही सुधारण्याविषयी येथील ठेकेदाराशी संपर्क करण्यात आला होता. मात्र त्यासाठी मोबदला मिळत नसल्याने दुरुस्ती थांबल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सीसीटीव्हींच्या तांत्रिक बिघाडामुळे येथील सुरक्षा धोक्यात आली असून परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. याशिवाय रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांचा उपद्रवही सहन करावा लागतो आहे’, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संघटक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक शाखेच्या चौकीमध्ये सीसीटीव्हीचे स्क्रीन बसवण्याची जागा दिली असली तरी वाहतूक शाखेकडे या परिसरातील सीसीटीव्हीचे नियंत्रण नाही. तर या भागातील केवळ एक स्क्रीन त्या भागामध्ये आहे. मात्र त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे स्क्रीन बंद आहे. याशिवाय या भागामध्ये असलेले सीसीटीव्ही सुरू असून केवळ चार कॅमेऱ्यांमध्ये बिघाड असल्याचा येथील ठेकेदार सांगतो.
– दीपक चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर वाहतूक शाखा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv cameras close outside thane railway station
First published on: 20-01-2016 at 01:55 IST