ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा काँग्रेसच्या नावाने भरला होता. परंतु काँग्रेसकडुन अधिकृत उमेदवारी मिळून न शकल्यामुळे त्यांचा काँग्रेसच्या नावाने भरलेला अर्ज बाद झाला आहे. असे असले तरी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. सांबरे हे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदार संघाची जागा मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहिर केली. यानंतर लगेचच निलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास आघाडीमार्फत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांनी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा काँग्रेस पक्षाच्या नावाने अर्ज भरला होता. यामुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. यानिमित्ताने सांबरे हे काँग्रेसचे तिकीट मिळेल या आशेवर असल्याचे चित्र दिसून आले होते.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी रणरणत्या उन्हात, उमेदवारांचे प्रचारक सावलीत

काँग्रेस कडून सांबरे यांना अधिकृत उमेदवारी मिळू शकले नाही. यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांच्या छाननी प्रक्रियेत सांबरे यांनी काँग्रेसच्या नावाने भरलेला अर्ज बाद झाला आहे. असे असले तरी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैद्य ठरल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याचे चित्र आहे. यामुळे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.