ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक सीसीटीव्ही- आपल्या सुरक्षेसाठी’ हा उपक्रम सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरु केला होता. नागरिकांच्या दुकानाबाहेरील, घराबाहेरील सीसीटीव्ही पोलिसांनी त्यांच्या नियंत्रण कक्षामध्ये जोडले होते. या उपक्रमाची परिणामकारकता आता दिसू लागली आहे. ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ६३ गुन्हे आणि १६ हरविलेल्या मुलांचा शोध घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात. तसेच मुंबई नाशिक महामार्ग, वाडा भिवंडी रस्ता, मुरबाड असे महत्त्वाचे मार्ग या क्षेत्रातून जातात. त्यामुळे अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची देखील या भागातून वाहतुक होत असते.
ग्रामीण पोलिसांची हद्द ही विस्तीर्ण असून गाव-पाड्यांची संख्या देखील अधिक आहे. पोलिसांना गाव, पाडे गाठून गुन्ह्यांचा तपास करायचा असतो. भिवंडीत गोदामे आहेत. तसेच पादचाऱ्यांच्या सोनसाखळ्या चोरीचे किंवा घरफोडीची प्रकरणे देखील समोर येत असतात. महामार्ग असल्याने अनेकदा एखादी हत्या झाल्यानंतर महामार्गालगत मृतदेह फेकणे, दोन गटामध्ये वादाचे प्रसंग असे प्रकार देखील होतात.
गाव पाड्यात काही झाल्यास त्याची माहिती पोलिसांना थेट मिळणे कठीण होते. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक सीसीटीव्ही – आपल्या सुरक्षेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला होता. संबंधित पोलीस अधिकारी गावातील सरपंच, व्यापारी, नागरिकांची भेट घेऊन या उपक्रमाची माहिती नागरिकांना देत होते. त्यानंतर नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाबाहेरील किंवा घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यास सहमती दर्शविली होती.
येथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. आतापर्यंत एक हजारहून अधिक कॅमेरे तांत्रिकदृष्ट्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जोडण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचा आता पोलिसांना फायदा होत आहे. या उपक्रमामुळे ६३ गुन्हे उघडकीस आणण्यास आणि हरविलेल्या १६ जणांचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले. हत्ये सारख्या प्रकरणांचा देखील उलगडा या सीसीटीव्हीमुळे झाला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाचा तपासासाठी वापर
पोलिसांना महत्त्वाच्या प्रकरणांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाचा तपासासाठी वापर झाला. यामध्ये भिवंडी तालुका, शहापूर पोलीस ठाण्यातील हत्या प्रकरण, एका आश्रम शाळेतील तीन अल्पयीन मुलींचा शोध तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करणे शक्य झाले आहे.
चौकट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांचा तपास करणे शक्य होत आहे. या उपक्रमाची परिणामकारकता दिसत आहे. – डाॅ. डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस.