बदलापूर : सातत्याने उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या आणि त्यामुळे नोकरदार वर्गाचे बिघडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. गुरूवारी प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात स्थानक व्यवस्थापकांना घेराव घालत उशिराने येणाऱ्या लोकलबाबत जाब विचारला. सोबतच स्थानकात उद्घोषणा व्यवस्थित होत नसल्याने गाड्यांची सद्यस्थिती कळत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होत असून त्याच संतापातून प्रवाशांनी गुरूवारी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात लेखी उत्तर देण्याची मागणी केली. त्यावरून बराच काळ फलाट क्रमांक तीनवर गोंधळ सुरू होता.

बदलापूर रेल्वे प्रवाशांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दररोज १५ ते २० मिनिटांच्या उशिराने लोकलगाड्या धावत असल्याने नोकरदार वर्गाला कार्यालयात पोहोचण्यास उशिर होतो. एक लोकलगाडी उशिराने आल्यास त्याच्या मागच्या लोकल गाड्याही उशिराने धावतात. परिणामी प्रवाशांची संख्या वाढत जाते. परिणामी गर्दीने लोकल ओसांडून वाहतात. अशावेळी प्रवाशांची लोकलमध्ये चढण्यासाठी मोठी धावपळ होते. दररोज लोकलमुळे कार्यालयात लेट मार्क लागत असल्याने खासगी कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उशिराने येणाऱ्या लोकल गाड्यांची माहिती वेळेवर दिली जात नसल्याने प्रवाशांचा संताप वाढतो आहे.

याच संतापातून गुरूवारी रेल्वे प्रवाशांनी फलाट क्रमांक तीनवर असलेल्या स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रवाशांनी उपस्थित असलेल्या स्थानक प्रबंधकांना जाब विचारला. लोकल गाड्यांच्या उशिराने येण्याची सूचना प्रवाशांना वेळेत दिली जात नाही. केली जाणआरी उद्घोषणा प्रवाशांना ऐकू येत नाही. तीचा आवाज कमी असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारी यावेळी प्रवाशांनी केल्या. सोबतच वेळेवर लोकल येण्याची माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांत गोंधळ वाढतो आहे. कर्जतहून येणारी एखादी लोकल उशिराने येत असल्यास तिची माहिती काही मिनिटे आधी दिली जात नाही. त्यामुळे समोर असलेली बदलापुरहून सुटणारी लोकल प्रवासी पकडत नाही. शेवटी बदलापुरहून सुटणारी लोकलही जाते आणि कर्जतवरून येणारी लोकलही उशिराने येते त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढतो, अशा तक्रारी यावेळी प्रवाशांनी केल्या.

लोकल उशिराने धावते हे लिहून द्या

दररोज लोकल उशिराने धावत आहेत. मात्र कार्यालयात दररोज लोकलचे कारण देऊन मान्य केले जात नाही. त्यावर लेटमार्क लागतो. तसेच दररोज लोकल उशिराने धावत असल्याची माहिती आणि कारण अधिकृतपणे रेल्वेतर्फे सांगितले जात नाही. त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांना त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उशिराने येण्याचे कारण लेखी द्या अशी मागणी एका महिला प्रवाशाने लावून धरली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने त्या महिलेला ते कारण लेखी दिले.

लोकल २० मिनिटे उशिराने

बुधवारी एका अपघातामुळे लोकल गाड्यां अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. गुरूवारी असे कोणतेही कारण नसताना लोकल गाड्या २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण होते.